जिल्ह्यात जमावबंदी लागू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:20 AM2021-02-16T04:20:21+5:302021-02-16T04:20:21+5:30
अकोला: जिल्ह्यात गत पंधरा दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना ...
अकोला: जिल्ह्यात गत पंधरा दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात सोमवार, १५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीपासून २८ फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी लागू करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेेंद्र पापळकर यांनी सोमवारी दिला. त्यानुसार जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना गर्दी करता येणार नाही.
फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. १ ते १५ फेब्रुवारी अखेर पंधरा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात ९३९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी पाच िकंवा त्यापेक्षा जास्त लोकांना गर्दी करता येणार नाही. जमावबंदीच्या कालवधीत जिल्ह्यातील धार्मिक स्वरुपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलने, सामूहिक कार्यक्रम, सभा, बैठका इत्यादींसाठी केवळ ५० व्यक्तींना उपस्थित राहता येणार आहे. तसेच मिरवणुका व रॅली काढण्यास पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे. लग्न समारंभांसाठी केवळ ५० व्यक्तींना उपस्थित राहता येणार असून, लग्नसमारंभांसाठी १० वाजेपर्यंतच परवानगी राहणार आहे.
जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी होणार नाही, यासाठी स्थानिक महानरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायतींनी दक्षता घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात देण्यात आले. जिल्ह्यातील धार्मिक संस्था, प्रार्थना स्थळे इत्यादी ठिकाणी कार्यक्रमांमध्ये गर्दी होणार नाही, यासाठी उपाययोजना करुन फिजिकल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर बंधनकारक राहणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.
शाळा, महाविद्यालये बंद!
जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते नववीपर्यंतच्या सर्व शाळा, सर्व महाविद्यालये, खासगी शैक्षणिक प्रशिक्षण केंद्र, खासगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येत असल्याचा आदेशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला आहे.