अतिउत्साही महाभागांमुळे ‘संचारबंदी’चा फज्जा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 10:31 AM2020-03-28T10:31:08+5:302020-03-28T10:31:24+5:30
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी आणि ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. संचारबंदी काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली राहतील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यामुळे शुक्रवारपासून अनेक नागरिकांनी या सवलतीचा गैरफायदा घेत अशा वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडणे पसंत केले. त्यामुळे गत दोन दिवसांपेक्षा शुक्रवारी अकोल्यातील अनेक भागांमध्ये वाहनांची वर्दळ तुलनेने वाढलेली दिसली. अनेक ठिकाणी जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना नागरिकांनी सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) ठेवणे बंधनकारक असले तरी ते पाळले जात नसल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, टिळक रोड, गांधी रोड, जनता बाजार, गोरक्षण रोड, शहरातून जाणारा राष्टÑीय महामार्ग, कौलखेड रोड, डाबकी रोड अशा अनेक मार्गांवर शुक्रवारी वाहनांची वर्दळ वाढल्याचे चित्र होते. तर शहराअंतर्गत गल्लीबोळांमध्ये युवकांचे घोळकेही गप्पा मारताना आढळून आले.
साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ अंतर्गत पाच वर्षांची शिक्षा
या कायद्यातील कलम ३ नुसार शासनाने पारित केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास भादंविच्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल. भारतीय दंड संहिता १८६० चे कलम २ नुसार कुठल्याही शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी त्यांचे कर्तव्य पार पाडत असताना अडथळा निर्माण केल्यास गुन्हा दखल करण्यात येईल व सदर गुन्ह्यात पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते.