तांत्रिक अडचणींमुळे पोस्ट बँकेकडे ग्राहकांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 02:03 PM2018-11-10T14:03:49+5:302018-11-10T14:03:57+5:30
अकोला: कनेक्टिव्हिटी आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे तीन महिन्यांआधी उद्घाटित झालेल्या पोस्ट बँकेकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. नवीन खातेदारांची संख्या आणि दररोज येत असलेल्या अडचणीमुळे पोस्ट बँक सुरू होण्याआधीच अनेक संकटात फसली आहे.
- संजय खांडेकर
अकोला: कनेक्टिव्हिटी आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे तीन महिन्यांआधी उद्घाटित झालेल्या पोस्ट बँकेकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. नवीन खातेदारांची संख्या आणि दररोज येत असलेल्या अडचणीमुळे पोस्ट बँक सुरू होण्याआधीच अनेक संकटात फसली आहे.
‘आपली बँक, आपल्या दारी’ या इंडिया पोस्ट पेमेन्ट्स बँकेची सेवा १ सप्टेंबरपासून देशभरात एकाच वेळी सुरू झाली. संपूर्ण देशात एकाच वेळी क्यू.आर. कार्ड सेवा देणाऱ्या पोस्ट बँकेला चांगला प्रतिसाद मिळेल ही अपेक्षा होती; मात्र तांत्रिक अडचणींत पोस्ट बँक फसल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. पोस्ट बँकेत खाते उघडून अनेकांनी क्यू.आर. कार्ड मिळविले; मात्र एटीएमप्रमाणे सेवा नसल्याने आणि त्यासंदर्भात अनेक गैरसमज नागरिकांमध्ये असल्याने नवीन बँक खात्यांना ब्रेक लागत आहे. विशेष म्हणजे ग्राहकांना सेवा देण्यातही पोस्ट बँक प्रशासन अपयशी ठरत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या आहे. अकोला -वाशिम जिल्ह्यातील ३९९ शाखा आणि सहशाखेंच्या माध्यमातून पोस्ट बँक सेवेचा प्रारंभ झाला; मात्र नवीन खातेदारांना जोडण्यात पोस्ट विभाग अपयशी पडले आहे. ५ हजाराच्या वरदेखील पोस्ट बँकेचे खाते होऊ शकले नाही. त्यामुळे ग्राहकांनी पोस्ट बँकेकडे अक्षरश: पाठ फिरविली आहे.
देशातील वित्तीय समृद्धीचा एकमेव उद्देश समोर ठेवून पोस्ट बँकेची संकल्प पुढे आली. ज्येष्ठ नागरिकांपासून तर विद्यार्थी, शेतकरी, किराणा दुकान, शहरी प्रवासी, लघू उद्योग, गृहिणी यांच्यासाठी ही बँक विशेष सेवा देणार, असे म्हटले गेले. जमा खात्यापासून तर मनी ट्रान्सफर, सबसिडी, उत्पादन-सेवा आदी उपक्रम राबविले जाणार होते; मात्र तांत्रिक अडचणींवर वेळीच मात करण्यात येत नसल्याने पोस्ट खात्याप्रमाणेच पोस्ट बँक मागे पडत आहे.
आधार कार्ड लिंक असल्याने ग्राहकास जन्म तारीख विचारली जाते. त्यानंतर ओटीपी क्रमांक मागितला जातो. तीन मिनिटाच्या आतच पुन्हा दुसरा ओटीपी मागितला जात आहे. कनेक्टिव्हिटीच्यादेखील अनेक समस्या आहेत.
- अनिल मानकर, ग्राहक अकोला.
डीबीटी पुरती मर्यादित झाली बँक
शासनाच्या विविध सबसिडीच्या योजनांसाठी, डायरेक्ट बेनिफीट टान्सफर सेवा देण्यासाठी पोस्ट बँक सेवा सध्या तरी अस्तित्वात आहे. त्यामुळे शासकीय योजना घेत असलेल्या व्यक्तींनाच पोस्ट बँक खात्यातर्फे ग्राहक केल्या जात आहे.