गरिबांच्या जेवणातील प्रथिनांवर घाला; डाळ मिळणार आता केवळ एक किलो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:21 PM2019-03-08T12:21:58+5:302019-03-08T12:22:06+5:30
अकोला: सार्वजनिक व्यवस्था अंतर्गत गरीब शिधापत्रिकाधारकांना प्रतिमहा तूर व हरभरा यापैकी एक डाळ एक किलो वितरित करण्याचा निर्णय शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत १ मार्च रोजी घेण्यात आला. प्र
- संतोष येलकर
अकोला: सार्वजनिक व्यवस्था अंतर्गत गरीब शिधापत्रिकाधारकांना प्रतिमहा तूर व हरभरा यापैकी एक डाळ एक किलो वितरित करण्याचा निर्णय शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत १ मार्च रोजी घेण्यात आला. प्रतिमहा केवळ एक किलो डाळ वितरित करण्यात येणार असल्याने, गरीब शिधापत्रिकाधारकांच्या जेवणातील प्रथिनांवर घाला घालण्यात आला आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत राज्यातील अंत्योदय अन्न योजना आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गटातील लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना यापूर्वी दरमहा तूर, हरभरा व उडीद इत्यादी डाळींचे प्रत्येकी एक किलोप्रमाणे रास्त भाव दुकानांमधून वितरण करण्यात येत होते. १ मार्च २०१९ रोजीच्या शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्णयानुसार, आता सार्वजनिक व्यवस्था अंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना प्रतिमहा तूर डाळ व हरभरा डाळ या दोन डाळींपैकी एक डाळ प्रत्येकी एक किलोप्रमाणे वितरित करण्यात येणार आहे. डाळीचे वितरण कमी करण्यात आल्याने, गरिबांच्या जेवणातील डाळीचे प्रमाण कमी होणार आहे. त्यामुळे प्रतिमहा केवळ एक किलो डाळ वितरण करण्याचा शासनाचा हा निर्णय गरीब शिधापत्रिकाधारकांच्या जेवणातील प्रथिनांवर घाला घालणारा ठरणार आहे.
तूर डाळीच्या दरात २० रुपयांची वाढ!
सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गटातील लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना तूर डाळ प्रतिकिलो ५५ रुपये व हरभरा डाळ ४५ रुपये प्रतिकिलो दराने वितरित करण्याचा निर्णय शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला आहे. यापूर्वी शिधापत्रिकाधारकांना तूर डाळ ३५ रुपये प्रतिकिलो दराने वितरित करण्यात येत होती. आता ही डाळ ५५ रुपये प्रतिकिलो दराने वितरित करण्यात येणार असल्याने, रास्त भाव दुकानांमधून वितरित होणाऱ्या तूर डाळीच्या दरात प्रतिकिलो २० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.