जिल्हा परिषदेच्या ग्रामीण रस्ते विकासकामांच्या निधीला कात्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 11:02 AM2021-09-06T11:02:12+5:302021-09-06T11:02:26+5:30
Cut the funds for Zilla Parishad's rural road development works : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण रस्ते विकासकामांच्या निधीला कात्री लागल्याचे वास्तव समोर येत आहे.
अकोला : जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत २०२१-२२ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण आणि इतर जिल्हा मार्ग (इजिमा) विकास व मजबुतीकरणाच्या कामांसाठी जिल्हा परिषदेला मंजूर करण्यात आलेल्या निधीपैकी दायित्वापोटी १० कोटी ६३ लाख रुपयांचा निधी कमी करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण रस्ते विकासकामांच्या निधीला कात्री लागल्याचे वास्तव समोर येत आहे.
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत २०२१-२२ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण कामांसाठी ११ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर असून, त्यामधून ३० टक्के निधी कोविड उपाययोजनांसाठी कपात करुन सुधारित नियतव्यय ८ कोटी ५ लाख रुपये करण्यात आले. या सुधारित नियतव्यय निधीमध्ये ४ कोटी ५४ लाख रुपये दायित्व दाखविण्यात आले आहे. तसेच जिल्हा परिषद अंतर्गत इतर जिल्हा मार्ग (इजिमा) रस्ते विकास व मजबुतीकरण कामांसाठी १३ कोटी ५० लाख रुपयांचे नियतव्यय मंजूर होते. त्यापैकी ३० टक्के कोविड निधी कपात करण्यात आला असून, सुधारित नियतव्यय ९ कोटी ४५ लाख रुपये करण्यात आले असून, त्यामध्येही ६ कोटी ९ लाख रुपयांचे दायित्व दाखविण्यात आले. जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण आणि इतर जिल्हा मार्ग विकास मजबुतीकरणाच्या कामांसाठी सुधारित मंजूर निधीमधून दायित्वापोटी एकूण १० कोटी ६३ लाख रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा ग्रामीण रस्ते आणि इतर जिल्हा मार्ग विकास व मजबुतीकरणाच्या कामांच्या निधीला कात्री लागली आहे.
दायित्वापोटी कपात केलेली अशी आहे रक्कम !
ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण : ४ कोटी ५४ लाख रुपये
इतर जिल्हा मार्ग विकास व मजबुतीकरण : ६ कोटी ९ लाख रुपये