आठ महिन्यांत सिलिंडर २९३ रुपयांनी महागले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 02:55 PM2018-11-12T14:55:53+5:302018-11-12T14:56:43+5:30
अकोला : गेल्या आठ महिन्यांत सिलिंडरच्या किमतीत तब्बल २९३ रुपयांनी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीयस्तरावरील दराचा आढावा घेत दर महिन्यात ही वाढ करण्यात आली आहे.
अकोला : गेल्या आठ महिन्यांत सिलिंडरच्या किमतीत तब्बल २९३ रुपयांनी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीयस्तरावरील दराचा आढावा घेत दर महिन्यात ही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात अनुदानित सिलिंडरवर ४.९५ रुपयांनी तर विनाअनुदानित सिलिंडरवर २९३ रुपये वाढले आहेत. त्यामुळे आता विनाअनुदानित सिलिंडरसाठी ९९३ रुपये मोजावे लागणार आहेत.
ऐन दिवाळीच्या तोंडावर केंद्र शासनाने विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या भावात सातत्याने वाढ करून दिवाळीत महागाईची भेट दिली आहे. घरगुती वापराचा अनुदानित गॅस सिलिंडर ५१४.५८ रुपयांना मिळत असला, तरी अनुदान न घेणाऱ्यांसाठी हे सिलिंडर आता ९९३ रुपयांचे झाले आहे. आठ महिन्यांत सिलिंडर २९३ रुपयांनी महागल्याचे एकंदरीत चित्र आहे. या दरवाढीमुळे ग्राहकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अनुदानित घरगुती सिलिंडरची किंमत एप्रिल २०१८ पासून सातत्याने वाढत आहे. दरवाढीचा हा आलेख चढताच असल्याने सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत सातत्याने होणाºया वाढीविरुद्ध अ. भा. ग्राहक पंचायत समितीच्या पदाधिकाºयांनी ठराव घेतला. यापलीकडे केवळ नाममात्र आंदोलन केले जात आहे.
डिसेंबरमध्ये हजाराच्या पलीकडे ...
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील उलाढाल लक्षात घेता येत्या डिसेंबर महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरचे भाव एक हजार रुपयांच्या पलीकडे जाणार असल्याचे संकेत आहेत.
सरकारकडून नियंत्रणाची गरज!
आंतरराष्ट्रीय बाजारानुसार देशांतर्गत गॅस सिलिंडरची दरवाढ निश्चित असते. सातत्याने होत असलेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. शासनाकडून मिळणारी सबसिडी उशिराने येत असल्याने लोकांच्या खिशातून आधी पैसा जातो. शासनाने यावर तोडगा काढून नियंत्रण आणले पाहिजे, अशी मागणी होत आहे.
डीलरचे कमिशनही ग्राहकाकडून
कें द्राने नोव्हेंबरमध्ये दोनदा सिलिंडरच्या भावात वाढ केली. १ नोव्हेंबर रोजी २.९४ रुपयांची वाढ केली. त्यानंतर २ नोव्हेंबर रोजी डीलर्सचे कमिशन वाढविले. हा भारही ग्राहकांच्या डोक्यावर टाकला गेला.