दाभोलकर, पानसरे यांच्या मारेक-यांचा छडा लावा!
By admin | Published: August 21, 2015 01:06 AM2015-08-21T01:06:42+5:302015-08-21T01:06:42+5:30
अंनिस, भाकप व पुरोगामी संघटनांचे धरणे आंदोलन
अकोला: अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्य खर्ची घालणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर तसेच कॉ. अँड. गोविंदराव पानसरे यांच्या मारेकर्यांचा छडा लावा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत समावेश करावे, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा या व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने गुरुवार, २0 ऑगस्ट रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकर्यांचा तपास लावावा यासाठी राज्यभर ह्यहिंसेला नकार..मानवतेचा स्वीकारह्ण हे अभियान सुरू करण्यात आले आहे. डॉ. दाभोलकरांच्या द्वितीय स्मृतिदिनाचे औचित्य साधून गुरुवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. अँड. गोविंदराव पानसरे यांच्या मारेकर्यांचा शोध लावून त्यांच्याविरुद्ध कारवाई करणे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत समावेश करावे, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा, संत गाडगेबाबा यांच्या दहा कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी व जिल्हय़ात दारूबंदी लागू करावी, आदी मागण्यांसाठी सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे धरणे आंदोलन करण्यात आले. धरणे मंडपात महाराष्ट्र अंनिसचे कार्याध्यक्ष बबनराव कानकिरड, गुरुदेव सेवा मंडळाचे भानुदास कराळे, भाकपचे अँड. श्रीराम सोनोने, रमेश गायकवाड, श्रीराम मोडक, भा. ना. लांडे गुरुजी, अहमदखाँ पठाण, शेकापचे प्रदीप देशमुख, महादेवराव मोडक, भूदान यज्ञ मंडळाचे वसंतराव केदार, प्रा. संजय तिडके, रामेश्वर बरगट, विजय ढुके, देवराव पाटील, आर. के. आहाळे यांच्यासह पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते