डाबकी रोड रेल्वेगेट १६ मेपर्यंत बंद राहणार!
By रवी दामोदर | Published: May 10, 2023 06:17 PM2023-05-10T18:17:08+5:302023-05-10T18:17:17+5:30
रेल्वे क्रॉसिंग गेट देखभाल दुरुस्तीचे होणार काम
अकोला : अकोला ते गायगाव दरम्यानच्या लोहमार्गावरील डाबकी रोड परिसरातील रेल्वे क्रॉसिंग गेट देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी बुधवार, १० मे ते मंगळवार, १६ मे पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
रेल्वे रूळ व फाटकाच्या आतील रस्त्याच्या कामासाठी रेल्वे गेट सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने गायगावकडे जाणाऱ्या वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. रेल्वेच्या वरिष्ठ खंड अभियंता कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अकोला ते गायगाव लोहमार्गावरील रेल्वे क्रॉसिंग गेट क्र. ३६-ए अंतर्गत रेल्वे रूळ व पलीकडे जाण्यासाठी असलेल्या डांबरी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. परिणामी या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रेल्वे रूळ व पार करण्यासाठी असलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.
या कामासाठी बुधवार १० मे ते मंगळवार १६ मे या कालावधीत सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंत रेल्वे गेट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येत आहे. सायंकाळी ६ ते सकाळी ६ या कालावधीत मात्र रेल्वे गेट वाहतुकीसाठी खुले ठेवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.