दलित वस्ती सुधार योजना; अखेर १४ कोटींच्या कामाचे सर्वेक्षण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 04:13 PM2018-04-03T16:13:09+5:302018-04-03T16:15:17+5:30
अकोला : महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी समाजकल्याण विभागाला खरमरीत पत्र दिल्यानंतर सर्वेक्षणाच्या कामासाठी समाजकल्याण विभाग व मनपाची यंत्रणा कार्यरत झाली आहे. दोन्ही यंत्रणांच्यावतीने सोमवारी सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली.
अकोला : समाजकल्याण विभागाच्या दिरंगाईमुळे महापालिकेला प्राप्त दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत १४ कोटींची कामे रखडली होती. या प्रकरणी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी समाजकल्याण विभागाला खरमरीत पत्र दिल्यानंतर सर्वेक्षणाच्या कामासाठी समाजकल्याण विभाग व मनपाची यंत्रणा कार्यरत झाली आहे. दोन्ही यंत्रणांच्यावतीने सोमवारी सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली.
महापालिकेला २०१७-१८ वर्षात दलित वस्ती सुधारणा योजनेसाठी १४ कोटींचा निधी प्राप्त झाला. दलित वस्तीमधील नवबौद्ध घटकांची दरडोई लोकसंख्या गृहित धरून प्रभागांमध्ये विकास कामे प्रस्तावित केले जातात. नगरसेवकांच्या माध्यमातून विकास कामांच्या यादीला सर्वसाधारण सभेची मंजुरी क्रमप्राप्त ठरते. यासंदर्भात सभेने विकास कामांची यादी मंजूर केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घेण्यात आली. जिल्हाधिकाºयांनी सुद्धा दलित वस्तीच्या कामांना मंजुरी देऊन यादी सर्वेक्षणासाठी विशेष समाजकल्याण विभागाकडे पाठवली. सदर यादीवर समाजकल्याण विभागाने तातडीने निर्णय घेणे अपेक्षित असताना मागील तीन महिन्यांपासून मनुष्यबळाची कमतरता असल्याची लंगडी सबब समोर करीत सर्वेक्षणाला टाळाटाळ केल्याचे समोर आले. परिणामी १४ कोटींच्या कामांना ग्रहण लागले होते. याविषयी मनपाच्या बांधकाम विभागाने समाजकल्याण विभागाला दोनवेळा स्मरणपत्रही दिले होते. सर्वेक्षणाच्या मुद्यावर होणारी दिरंगाई लक्षात घेता महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी आठ दिवसांपूर्वी समाजकल्याण विभागाला खरमरीत पत्र दिल्याची माहिती आहे. त्यानंतर संबंधित विभाग सर्वेक्षणासाठी सरसावल्याचे चित्र समोर आले.
दोन दिवसांत सर्व्हे
विशेष समाजकल्याण विभागाच्यावतीने सोमवारपासून दलित वस्तीमधील कामाच्या सर्वेक्षणाला प्रारंभ करण्यात आला. यासाठी मनपाच्या बांधकाम विभागाची चमू सरसावली असून, दोन्ही यंत्रणांकडून हा सर्व्हे ३ एप्रिलपर्यंत पूर्ण केला जाणार असल्याची माहिती आहे.
नगरसेवकांना दिलासा
समाजकल्याण विभागाच्या दिरंगाईमुळे १४ कोटींची कामे रखडली होती. यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी होती. यासंदर्भात भारिप-बमसंच्या गटनेत्या अॅड. धनश्री देव यांनी मनपाचा बांधकाम विभाग व समाजकल्याण विभागाच्या कामकाजावर ताशेरे ओढले होते. सर्व्हेला सुरुवात होताच नगरसेवकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.