धरणे भरली, पण कॅनॉलची देखभाल दुरुस्ती रखडली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 12:39 PM2019-11-18T12:39:59+5:302019-11-18T12:40:14+5:30
अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे यावर्षी ही कामे लांबल्याने पाणी सोडण्यास विलंब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जिल्ह्यातील धरणात यावर्षी मुबलक जलसाठा आहे; परंतु रब्बी हंगामातील पिकांना पाणी सोडण्यासाठी कॅनॉलच्या देखभाल दुरुस्तीची कामेच रखडल्याने १० डिसेंबरपासून पाणी सोडणार कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून, अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे यावर्षी ही कामे लांबल्याने पाणी सोडण्यास विलंब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यावर्षी उशिरा धरणे भरली आहेत. त्यामुळे कॅनॉलची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी भरपूर वेळ होता. तसेही आतापर्यंत ही देखभाल दुरुस्तीची कामे होणे गरजेचे होते.याकडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याने पाणी उपलब्ध असूनही कॅनॉलच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाअभावी पाणी सोडण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. दुरुस्तीऐवजी पाणी सोडले तर पाण्याचा मोठा अपव्यव होणार असल्याने या कामाकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे. पावसाळा सुरू होताबरोबर या कामाची निविदा काढणे व इतर संबंधित कामाची प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असते; परंतु यावर्षी विलंब झाला आहे.
अकोला शहराला पाणी पुरवठा करणाºया काटेपूर्णा प्र्रकल्पात जुलै महिन्यापर्यंत ५ टक्केच जलसाठा शिल्लक राहिल्याने पाणीटंचाईचे भीषण संकट अकोलेकरांवर उभे ठाकले होते. इतरही सर्वच धरणांचा जलसाठा तळाला लागला होता. तथापि, सप्टेंबर महिन्यापासून सतत व दमदार पाऊस पडला. परतीच्या पावसाने त्यामध्ये आणखी भर घातल्याने जिल्ह्यातील उमा व घुंगशी प्रकल्प वगळता सर्वच मोठे, मध्यम प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’ झाले. अकोला, बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वान प्रकल्पातून आजमितीस जेवढे पाणी उपलब्ध आहे, त्याच्या दुप्पट विसर्ग करण्यात आला.
काटेपूर्णा प्रकल्पाचे वक्रद्वार उघडण्यात आले होते. इतरही मध्यम प्रकल्पातून विसर्ग करण्यात आला. अकोला पूर संरक्षण योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या दगडपारवा प्रकल्पातून बांधले, तेव्हापासून दुसºयांदा विसर्ग करण्यात आला. आजमितीस काटेपूर्णा व वान या मोठ्या प्रकल्पात १०० टक्के जलसाठा आहे.
मोर्णा, निर्गुणा मध्यम प्रकल्पातही शंभर टक्के जलसाठा असून, उमा प्रकल्पात ८७.६७ तर घुंगशी बॅरजेमध्ये ८८.७१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यावर्षी रब्बी हंगामासाठी मुबलक पाणी असल्याने सिंचनासाठी पाणी मिळणार आहे. तथापि, कॅनॉलच्या देखभाल दुरुस्तीची कामे अद्याप झाली नसल्याने सिंचनाला पाणी मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. काटेपूर्णा प्रकल्पातून आठ हजार हेक्टरवर सिंंचनासाठी पाणी सोडण्यात येत असते. यावर्षी या प्रकल्पातून रब्बी हंगामात शेतकºयांच्या शेवटच्या टोकापर्यंत शेतीला पाणी सोडण्यात येणार आहे. वान प्रकल्पातूनही किंबहुना दरवर्षीप्रमाणे पूर्ण क्षमतेने सिंचन करण्यावर भर देण्यात आला आहे.
अकोला उपविभागांतर्गत मोर्णा, निर्गुणा व दगडपारवा प्रकल्पातून १२ हजार हेक्टरवर सिंंचनासाठी पाणी देण्यात येणार आहे. उमा व घुंगशी बॅरेजमधून रब्बी हंगामाला पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी हे सर्व प्रकल्प मिळून ३८ हजार हेक्टरवर सिंचन व्यवस्था अपेक्षित असल्याचे पाटबंधारे विभागाचे अभियंता चिन्मय वाकोडे यांनी सांगितले.
काटेपूर्णा धरण कॅनॉलच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाचे वाटप पत्र दिले आहे. त्यामुळे लवकरच देखभाल दुरुस्तीच्या कामास सुरुवात होण्याची शक्यता आहे.
- अभिजित नितनवरे,
उपअभियंता,
काटेपूर्णा प्रकल्प.