कॅनॉलच्या दुरुस्तीअभावी धरणाचे पाणी रस्त्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:21 AM2021-03-01T04:21:21+5:302021-03-01T04:21:21+5:30
अमोल सोनोने पांढुर्णा: पातूर तालुक्यातील चोंडीनजीक निर्गुणा धरणावर असलेल्या कॅनॉलची दुरुस्ती केली नसल्यामुळे तसेच काही नाल्या जीर्ण झाल्यामुळे धरणातील ...
अमोल सोनोने
पांढुर्णा: पातूर तालुक्यातील चोंडीनजीक निर्गुणा धरणावर असलेल्या कॅनॉलची दुरुस्ती केली नसल्यामुळे तसेच काही नाल्या जीर्ण झाल्यामुळे धरणातील पाणी रस्त्यावर येत असून, लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. याकडे लघु पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
चोंडी नजीक असलेल्या निर्गुणा धरण मायनरवर पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या बांधण्यात आल्या आहेत. यापैकी काही नाल्या जीर्ण झाल्या आहेत. तसेच काही कॅनॉलची साफसफाईच करण्यात आली नाही. परिणामी कॅनॉलला भेगा पडल्या आहेत. यामधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. गत महिन्याभरापासून रस्त्यावर पाणी वाहत असून, याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे. चोंडी -मेडशी रस्त्यावर हजारो लिटर पाणी वाया जात असून, रस्त्यावर डबके साचले आहेत. शासन एकीकडे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करतो; मात्र दुसरीकडे पाण्याचा असा अपव्यय होत असल्याचे दिसून येत आहे. पातूर तालुक्यात धरणांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे, परंतु योग्य व्यवस्थापनाअभावी पाण्यापासून अनेकांना वंचित राहावे लागते. चोंडी निर्गुणा शिवारात या पाण्याचा अपव्यय सुरू असल्याने संबंधित विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. याकडे लक्ष देऊन दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. (फोटो)
सिंचनासाठी अडचण
पातूर तालुक्यातील चोंडी परिसरातील निर्गुणा धरणावरील कॅनॉलची साफसफाई, दुरुस्ती न केल्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो, अशातच पाण्याचा अपव्यय होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन पाण्याचा अपव्यय थांबविण्याची मागणी होत आहे.