ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या ६३ मालमत्तांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 10:30 AM2021-08-02T10:30:05+5:302021-08-02T10:30:21+5:30
Akola News : दुरुस्तीच्या कामांसाठी २ कोटी ३० लाख रुपयांच्या निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
- संतोष येलकर
अकोला : अतिवृष्टीच्या तडाख्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या ६३ मालमत्तांचे नुकसान झाले असून, दुरुस्तीच्या कामांसाठी २ कोटी ३० लाख रुपयांच्या निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हा परिषद प्रशासनामार्फत २९ जुलै रोजी शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
जिल्ह्यात २१ जुलै रोजी रात्रभर मुसळधार पाऊस बरसला, त्यामुळे नदी व नाल्यांना पूर आला. अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील विविध भागात घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून, रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्हा परिषद मालकीच्या जिल्ह्यातील ६३ मालमत्तांचेही नुकसान झाले असून, त्यामध्ये प्राथमिक शाळांच्या इमारती, ग्रामपंचायतींच्या इमारती तसेच सामाजिक सभागृह आदी प्रकारच्या मालमत्तांच्या नुकसानीचा समावेश आहे. जिल्हा परिषदअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मालमत्तांचे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर दुरुस्तीच्या कामांसाठी २ कोटी ३० लाख रुपयांच्या निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हा परिषद प्रशासनामार्फत शासनाच्या ग्राम विकास विभागाकडे पाठविण्यात आला आहे.
नुकसान झालेल्या अशा आहेत मालमत्ता !
अतिवृष्टीच्या तडाख्यात जिल्हा परिषदअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात ६३ मालमत्तांचे नुकसान झाले. त्यामध्ये ३३ प्राथमिक शाळा, ११ ग्रामपंचायती आणि १९ सामाजिक सभागृह, महिला मंडळ केंद्र, युवा केंद्र इत्यादी मालमत्तांच्या नुकसानीचा समावेश आहे.
२३९ कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे नुकसान!
अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्हा परिषदअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात २३९ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे नुकसान झाले असून, या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी ३५ कोटी ६५ कोटी रुपये निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हा परिषद प्रशासनामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषदअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात ६३ मालमत्तांचे नुकसान झाले आहे. तसेच रस्त्यांचे नुकसान झाले असून, मालमत्ता आणि रस्ते दुरुस्तीच्या कामांसाठी आवश्यक असलेल्या निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर दुरुस्तीची कामे सुरू करण्यात येणार आहेत.
- सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद