अतिवृष्टीच्या तडाख्यात १०५४२ हेक्टरीवरील पिकांचे नुकसान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:26 AM2021-09-10T04:26:11+5:302021-09-10T04:26:11+5:30
अकोला : पाऊस, अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात ६ ते ९ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील पाच तालुक्यांत १० हजार ५४२ ...
अकोला : पाऊस, अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात ६ ते ९ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील पाच तालुक्यांत १० हजार ५४२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गुरुवार ९ सप्टेंबर रोजी अमरावती विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला.
जिल्ह्यात ६ सप्टेंबरपासून जोरदार पाऊस बरसत आहे. त्यामध्ये सोमवार, ६ सप्टेंबर रोजी रात्री जिल्ह्यात धो धो पाऊस बरसला असून, मूर्तिजापूर तालुक्यासह जिल्ह्यातील ९ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील विविध भागात नदी व नाल्यांना पूर आला असून, शेतातील पिके पावसाच्या पाण्यात बुडाली. खरीप पिकांसह भाजीपाला व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार ६ ते ९ सप्टेंबरपर्यंत पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर व मूर्तिजापूर या पाच तालुक्यात १० हजार ५४२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यानुसार पाऊस आणि अतिवृष्टीच्या तडाख्यात जिल्ह्यातील पाच तालुक्यांत १० हजार ५४२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ९ सप्टेंबर रोजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला.
तालुकानिहाय पीक नुकसानीचा
असा आहे प्राथमिक अंदाज!
तालुका नुकसान (हेक्टर)
अकोला ३,२७२
अकोट २,६४७
तेल्हारा ३,४००
बाळापूर ८२०
मूर्तिजापूर ४४३
........................................................
एकूण १०,५४२
............................................................
३७६ घरांची पडझड;
१,४३० व्यक्ती बाधित!
अतिवृष्टी व पावसामुळे ६ ते ९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात बाधित ५७ गावांमध्ये ३७६ घरांची पडझड झाली. त्यामध्ये काही घरांचे अंशत: तर काही घरांचे पूर्णत: नुकसान झाले असून, १ हजार ४३० व्यक्ती बाधित झाले. अतिवृष्टी व पुराच्या कालावधीत जिल्ह्यात सात व्यक्तींचा मृत्यू झाल्याचेही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आलेल्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.
.......................
‘या’ पिकांचे झाले नुकसान!
अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर इत्यादी खरीप पिकांसह भाजीपाला व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
.....................................
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त अहवालानुसार ६ ते ९ सप्टेंबरपर्यत पाऊस आणि अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात १० हजार ५४२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल गुरुवारी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला.
संजय खडसे
निवासी उपजिल्हाधिकारी