अंधारसांवी येथे २०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:20 AM2021-09-27T04:20:35+5:302021-09-27T04:20:35+5:30

पांढुर्णा: पातूर तालुक्यातील अंधारसांगवी येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास अतिवृष्टी झाली असून, नदीनाले दुथडी भरून वाहत होते. पुराचे पाणी नदीकाठच्या ...

Damage to crops on 200 hectares at Andharsanvi | अंधारसांवी येथे २०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

अंधारसांवी येथे २०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Next

पांढुर्णा: पातूर तालुक्यातील अंधारसांगवी येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास अतिवृष्टी झाली असून, नदीनाले दुथडी भरून वाहत होते. पुराचे पाणी नदीकाठच्या शेतात शिरल्याने ३० हेक्टर शेतजमीन खरडून गेली असून, तब्बल २०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रविवार, दि. २६ सप्टेंबर रोजी महसूल विभागाच्या पथकाने नुकसानग्रस्त भागात पाहणी केली आहे.

पाऊस सतत सुरू असल्याने शेतकरी धास्तावला आहे. गत महिन्यातही परिसरात जोरदार पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले होते. याचा सर्व्हे करण्यात आला; मात्र अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. परिसरात पिके काढणीला आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरवण्याची भीती असल्याने शेतकरी चिंतित आहे. उडीद, मूग पिके हातातून गेली आता सोयबीनवर शेतकऱ्यांची मदार आहे. मात्र तेही हातातून जाते की काय, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी तहसीलदार दीपक बाजड, मंडळ अधिकारी अमित सबनीस, तलाठी लाड आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी होत आहे.

------------------------------------------------

अंधारसांगवी येथे पाहणी केली आहे. गत महिन्यात झालेल्या नुकसानाचे पंचनामे केले आहे. त्यामुळे पुन्हा पंचनामे करण्याची आवश्यकता नाही. वरिष्ठांना अहवाल सादर केला आहे.

-दीपक बाजड, तहसीलदार, पातूर.

--------------------------------

पुलावरून पाणी; अनेक गावांचा संपर्क तुटला!

परिसरातील पुलाची उंची कमी असल्याने नदी, नाल्यांना पूर येताच पुलावरून पाणी वाहते. त्यामुळे पांढुर्ण्यासह पिंपळडोळी, नवेगाव, सोनुना, जांभ, उंबरवाडी, दधम, चोंढी, धरण, घोटमाळ, भौरद, चारमोळी आदी गावांचा संपर्क तुटतो. त्यानंतर थातूरमातूर पुलावर मुरुम टाकण्यात येतो. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन नवीन पूल उभारण्याची मागणी होत आहे.

-------------------------------------

गुरांचे प्राण वाचले

आंधारसांगवी येथील नदीला पूर आला होता. सायंकाळच्या सुमारास गुरे घरी येत असताना पुराच्या पाण्यात २५ ते ३० गुरे वाहून गेली होती. सर्व गुरे निर्गुणा धरणाच्या काठापर्यंत गेल्यावर तेथून बाहेर पडले सुदैवाने सर्व गुरे सुखरूप घरी परतले. जीवित हानी झाली नाही.

----------------------

धामोरी परिसरात जोरदार पाऊस

जामठी बु.: धामोरी परिसरात दि. २५ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. गावाजवळील नाल्यास पूर आला होता. पुरामुळे पुलाजवळचा रस्त्याचा काही भाग खरडून गेला आहे. नाल्याच्या काठाच्या शेतात पुराचे पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.

Web Title: Damage to crops on 200 hectares at Andharsanvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.