अतिवृष्टीच्या तडाख्यात जिल्ह्यात ३४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:13 AM2021-07-24T04:13:30+5:302021-07-24T04:13:30+5:30

अकोला : अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात ३३ हजार ७९८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, ४ हजार २४९ ...

Damage to crops on 34,000 hectares in the district due to heavy rains! | अतिवृष्टीच्या तडाख्यात जिल्ह्यात ३४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान !

अतिवृष्टीच्या तडाख्यात जिल्ह्यात ३४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान !

googlenewsNext

अकोला : अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात ३३ हजार ७९८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, ४ हजार २४९ हेक्टर शेतजमीन खरडून गेल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शुक्रवार, २३ जुलै रोजी शासनाकडे पाठविण्यात आला.

जिल्ह्यात २१ जुलै रोजी रात्रभर मुसळधार पाऊस बरसला असून, त्यामध्ये अकोला, बार्शिटाकळी, बाळापूर व पातूर या चार तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नदी व नाल्यांना पूर आला असून, अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तसेच पुरामुळे नदी-नाल्याकाठची शेतजमीन खरडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिकांसह शेतजमिनीच्या नुकसानीमुळे आधीच अडचणीत असलेला शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार अकोला, बार्शिटाकळी, अकोट, तेल्हारा, बाळापूर व मूर्तिजापूर या सहा तालुक्यांमध्ये अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात ३३ हजार ७९८ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले असून, ४ हजार २४९ हेक्टर शेतजमीन खरडून गेल्याने नुकसान झाले. अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीसह शेतजमिनीचे नुकसान तसेच घरांच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

तालुकानिहाय असे आहे पिकांचे नुकसान...

तालुका क्षेत्र ( हेक्टर)

अकोला १९०७९

बार्शिटाकळी १८५०

अकोट १५०

तेल्हारा ३००

बाळापूर १२२४६

मूर्तिजापूर १७३

....................................................

एकूण ३३७९८

३३४ जनावरांसह ३९ कुक्कुट पक्ष्यांचा मृत्यू

अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात ३३४ मोठ्या व लहान दुधाळ जनावरांसह ३९ कुक्कुट पक्ष्यांचा मृत्यू झाला असून, पशुपालकांच्या मदतीसाठी १४ लाख १५ हजार ९५० रुपयांचे अनुदान आवश्यक असल्याचेही प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.

३३० गावांतील ३७८३ कुटुंबे बाधित

अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील ३३० गावांतील ३ हजार ७८३ कुटुंबे बाधित झाली असून, २५९ व्यक्तींना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आलेे आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले.

अतिवृष्टी पुरामुळे जिल्ह्यातील नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील नुकसानीचा अंतिम अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.

- संजय खडसे

निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला.

Web Title: Damage to crops on 34,000 hectares in the district due to heavy rains!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.