अवकाळी पावसामुळे नुकसान; शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा! वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By रवी दामोदर | Published: February 27, 2024 04:39 PM2024-02-27T16:39:10+5:302024-02-27T16:39:32+5:30
निवेदनानुसार, सोमवारी रात्री अचानक अवकाळी पावसाने थैमान घातले. त्यामुळे हरभरा, गहू, ज्वारी या पिकांचे व तसेच बागायती क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले.
अकोला : जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिके जमिनदोस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागात पंचनामे करून तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी करीत वंचित बहुजन आघाडीच्यावतीने दि.२७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनानुसार, सोमवारी रात्री अचानक अवकाळी पावसाने थैमान घातले. त्यामुळे हरभरा, गहू, ज्वारी या पिकांचे व तसेच बागायती क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले. प्रशासनाने तत्काळ सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकरी, शेतमजूरांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नुकसानग्रस्तांना मदत न मिळाल्यास वंचीत बहूजन आघाडीच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलींद इंगळे, महिला जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, माजी जि. प. अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य पुष्पा इंगळे, आरोग्य व शिक्षण सभापती मायाताई नाईक, माजी मनपा गटनेते गजानन गवई, किशोर जामणिक, विकास सदांशिव, अकोला पंचायत समितीचे उपसभापती अजय शेगांवकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.