मूर्तिजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे ७०० हेक्टरच्या वर नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:24 AM2021-09-09T04:24:16+5:302021-09-09T04:24:16+5:30

संजय उमक मूर्तिजापूर : तालुक्यात ६ व ७ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सर्वच ८ महसूल मंडळांत शेतकऱ्यांच्या ७०० ...

Damage to over 700 hectares due to heavy rains in Murtijapur taluka | मूर्तिजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे ७०० हेक्टरच्या वर नुकसान

मूर्तिजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे ७०० हेक्टरच्या वर नुकसान

Next

संजय उमक

मूर्तिजापूर : तालुक्यात ६ व ७ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सर्वच ८ महसूल मंडळांत शेतकऱ्यांच्या ७०० हेक्टरच्या वर शेतीवरील पिकाचे नुकसान झाले आहे. स्थानिक प्रशासनाच्या हवाल्यानुसार ४४३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यात कहर केला आहे. अनेक गावांतील घरात पाणी शिरले तर पावसामुळे ३४ घरांची पडझड झाली आहे. नदी-नाल्यांना पूर आल्याने काठावरील जमीन पाण्याखाली आहे. पावसाच्या पाण्यामुळे शेताला तलावाचे स्वरूप आल्याचे चित्र आहे.

तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

पावसामुळे उमा, पूर्णा, कमळगंगा, काटेपूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठी असलेल्या शेतांत पुराचे पाणी घुसून शेतकऱ्यांच्या ४४३ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ६ ते ७ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या पावसाची ८१.९ मिलीमीटर नोंद करण्यात आली, तर ८ सप्टेंबर रोजी दुपारपर्यंत १०.७ मिलीमीटर पावसाची नोंद आहे. आतापर्यंत तालुक्यात ७२६.९ मिलीमीटर पाऊस झाला असून, त्याची सरासरी ७२६.९ टक्के आहे. शासनाने तालुक्यातील महसूल मंडळात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून तत्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

-----------------

शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे ऑनलाइन अर्ज सादर करावा

गत दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी विमा कंपनीच्या ॲप्सद्वारे तत्काळ फोटो काढून ऑनलाइन तक्रार करू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

------------------

६-७ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला, जवळपास ३४ घरांची अंशतः पडझड झाली आणि ४४३ हेक्टर शेतीपिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. घराच्या पडझडीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत, शेतातील पाणी ओसरल्यावर शेतीपिकाच्या नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे करण्यात येतील.

- प्रदीप पवार, तहसीलदार, मूर्तिजापूर

-------------------

तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील सर्व महसूल मंडळांत नुकसानीचे सर्वेक्षण केले जाईल. तसेच पीक विमा काढलेल्या व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे ऑनलाइन अर्ज सादर करावा.

- अमृता काळे, तालुका कृषी अधिकारी, मूर्तिजापूर

Web Title: Damage to over 700 hectares due to heavy rains in Murtijapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.