अवकाळीचा तडाखा! ४ हजार ६० हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान
By रवी दामोदर | Published: April 10, 2024 08:27 PM2024-04-10T20:27:50+5:302024-04-10T20:28:21+5:30
जिल्ह्यातून पातूर तालुक्यात सर्वाधिक हानी : कांदा, मका, ज्वारीसह फळबागांना फटका
अकोला : दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपले असून, ७४ गावांमधील ४ हजार ६० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मंगळवार, बुधवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यात फटका बसला आहे. त्यात सार्वाधिक नुकसान पातूर तालुक्यात झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, ५५ घरांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
सध्या शेतशिवारात रब्बीचे पिके सोंगणीला आले असून, उन्हाळी पिके बहरलेली आहेत. दरम्यान अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा, मका, ज्वारीसह लिंबू, फळबागांना फटका बसला आहे. गतवर्षी खरीप हंगामात नुकसान झाले, त्यानंतर रब्बी हंगामात हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. जिल्ह्यात ८ व ९ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसाने गहू, ज्वारी, कांदा, मका, फळपीक, केळी भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले आहे.
७४ गावांत असे झाले नुकसान
तालुका - गावे - नुकसानग्रस्त क्षेत्र
बार्शीटाकळी - ०३ - ५ हेक्टर
तेल्हारा - ३१ - ९२९ हेक्टर
बाळापूर - १२ - २५० हेक्टर
पातूर - २४ - २ हजार ८६६ हेक्टर
मूर्तिजापूर - ०४ - १० हेक्टर