गारपीटीमुळे तुर, हरभरा, फळबागांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 07:02 PM2021-12-29T19:02:08+5:302021-12-29T19:02:25+5:30
Agriculture News : २ हजार ६०० हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
-संजय उमक
मूर्तिजापूर : तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे उभ्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. यात २ हजार ६०० हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
किनखेड, कामठा, मुरंबा, शिवण खुर्द, कमळणी, कमळखेड, निंबा, मोहखेड, खांदला, धोत्रा, कानडी, शेंद, उमरी अरब या भागाला गारपीटीचा जबर तडाखा बसला असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यासह शहरात मंगळवारी दुपारी २:३० वाजताच्या दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या हरभरा, गहू, तुर, कांदा व फळबाग पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भात काही जिल्ह्यांत गारपिटीसह प्रचंड प्रमाणात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली होती. दरम्यान २८ डिसेंबर रोजी दुपारी वीजांच्या कडकडाट गारपीटीसह पावसाने जोरदार झोडपून काढले. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली तालुकयातील अनेक शेतकऱ्यांनी तुरीची कापणी सुरूवात होण्यापूर्वीच पावसाने व गारपीटीने तुरीला वाळलेल्या शेंगा फुटून शेतात सर्वत्र दाणे विखुरल्याने दाण्यांचा सडा असल्याचे चित्र आहे. त्याच बरोबर हरभरा, गहू, कांदा पिके जमिनदोस्त झाली आहे तर फळबागांचे फळे व आलेला बार पडल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यातील मौजे किनखेड, शिवण, कामठा, मुरंबा, अनभोरा, कमळणी कमळखेड, निंबा, धोत्रा, धानोरा पाटेकर, शेंद, बिडगाव, शिवण खुर्द, मोहखेड, अनभोरा, कानडी, उमरी अरब या परीसरातील शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले. तर निंबा येथे गुरांच्या गोठ्यावर झाड उन्मळून पडल्याने गोठ्यात बांधलेली गुरे गंभीर जख्मी झाली आहेत खांदला येथे आवळा व लिंबाचा आकाराची गार पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.