वन्य प्राण्यांकडून नुकसान; शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:35 AM2020-12-12T04:35:30+5:302020-12-12T04:35:30+5:30
वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी भरपाईसाठी वन विभागाकडे अर्ज केले आहेत. सहायक वनसंरक्षक, अकोला यांच्या आदेशानुसार माहे ...
वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी भरपाईसाठी वन विभागाकडे अर्ज केले आहेत. सहायक वनसंरक्षक, अकोला यांच्या आदेशानुसार माहे फेब्रुवारी, मार्च व एप्रिल या कालावधीत जवळपास २०२ प्रकरणे मंजूर करण्यात आली होती; यापैकी फक्त वन परिक्षेत्र अधिकारी आलेगाव यांच्या कार्यालयामार्फत केवळ ५४ मंजूर प्रकरणांचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाच पैसे वाटप करण्यात आले; परंतु उपवनसंरक्षक कार्यालयाच्या दुर्लक्षतेमुळे फेब्रुवारी व मार्च महिन्यातील तसेच माहे जुलै, ऑगस्ट या काळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यपही भरपाई मिळाली नाही. यंदा सततचा पाऊस व परतीच्या पावसामुळे खरीप हंगामात मूग, उडीद, सोयाबीन व कपाशीचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी संकटात आहेत. तसेच वन्य प्राण्यांकडून नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष देऊन आलेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गावातील माहे, फेब्रुवारी, मार्च २०२० मधील जवळपास १५० प्रकरणे व माहे जुलै, ऑगस्ट महिन्यात झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
-------------------
आलेगाव वनपरिक्षेत्र कार्यालयामार्फत पाठविलेली प्रकरणे मंजूर झाले असून, शासनाकडून निधी प्राप्त होताच मंजूर यादीतील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात येईल.
-सतीश नालिंदे, वन परिक्षेत्र अधिकारी, आलेगाव.