दामिनी पथकाची छेडखानी करणाऱ्यांसह ७ प्रेमीयुगुलांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2022 11:18 AM2022-02-16T11:18:55+5:302022-02-16T11:19:01+5:30
Damini squad : महिनाभरात एकूण १९ छेडखानी करणाऱ्यांवर दामिनी पथकाने कारवाई केली.
अकोला : महिला व मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्थापन करण्यात आलेल्या दामिनी पथकाने छेडखानी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम उघडली आहे. महिनाभरात एकूण १९ छेडखानी करणाऱ्यांवर दामिनी पथकाने कारवाई केली. तसेच ७ प्रेमीयुगुलांवर पथकाने कारवाई केली तर १२४ जणांना समज देऊन सोडून दिले. महिलांविरुद्ध होणाऱ्या घटनांना प्रतिबंध होण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून तसेच अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनात दामिनी पथक सुरू करण्यात आले होते. दामिनी पथकाने १ जानेवारी ते १४ फेब्रुवारीदरम्यान छेडखानी करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम उघडली. या दरम्यान पथकाने अकोला शहरातील संवेदनशील ठिकाणी शहर गस्त घालून, भेटी देऊन महिलांविरुद्ध होणाऱ्या घटनांना आळा बसेल या उद्देशाने ३३ जनजागृती कार्यक्रम घेतले. शहरातील विविध संवेदनशील ठिकाणी प्रभावी पेट्रोलिंग करून एकूण ७ प्रेमीयुगुलांवर व इतर १९ छेडखानी करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कारवाई केली आहे.
दामिनी पथकाचा यावर राहणार वॉच
दामिनी पथकाने महिला व मुलींविरुद्ध होणाऱ्या घटनांना प्रतिबंध होण्याच्या उद्देशाने विविध महाविद्यालये, विद्यालये, शाळा, खासगी शिकवणी वर्ग, महिला आश्रम इत्यादी ठिकाणी वॉच ठेवणार आहे. महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एकूण ५३ ठिकाणी भेटी देण्यात आल्या.
हेल्पलाईनवर २९ तक्रारी
महिलांसाठी दामिनी पथकास ७४४७४१००१५ हा हेल्पलाईन क्रमांक देण्यात आलेला आहे. हेल्पलाईन क्रमांकावर एकूण २९ तक्रारी प्राप्त झाल्यात. त्यांचे निराकरण करण्यात आले आहे. महिलांसाठी दामिनी पथक हेल्पलाईन क्रमांकावर पीडित महिलांनी किंवा संकटात सापडलेल्या महिलांनी तक्रार केल्यास दामिनी पथकाव्दारे घटनास्थळी जाऊन मदत करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक उज्ज्वला देवकर यांनी सांगितले.