सायबर कॅफेवर दामिनी पथकाचा छापा
By admin | Published: June 28, 2016 02:18 AM2016-06-28T02:18:57+5:302016-06-28T02:18:57+5:30
डाबकीरोड स्थित मातोश्री सायबर कॅफेवर छापा, कॅफेमालक व युवतीला घेतले ताब्यात.
अकोला: डाबकी रोडवरील गणेश नगरमधील मातोश्री सायबर कॅफे प्रेमी युगुलांचा अड्डाच झाल्याच्या माहितीवरून दामिनी पथकाने सोमवारी सायंकाळी या सायबर कॅफेवर छापा मारला. यावेळी कॅफेचा मालक योगेश ढोरे व एका युवतीला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर डाबकी रोड पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. गणेश नगरमध्ये योगेश जनार्दन ढोरे याच्या मालकीचा मातोश्री सायबर कॅफे असून या ठिकाणी प्रेमी युगुलांची मोठी रेलचेल असल्याची माहिती दामिनी पथकाला मिळाली. त्यानंतर दामिनी पथकाने या सायबर कॅफेवर गत काही दिवसांपासून पाळत ठेवली असता या कॅफेत प्रेमी युगुलांना बसण्यासाठी विशेष व्यवस्था असल्याचे समोर आले. यासोबतच प्रेमी युगुलांना कॅफेमध्ये बसण्यासाठी विशेष दरही आकारण्यात येत होता. मातोश्री सायबर कॅफेमध्ये प्रेमी युगुलांचे अश्लील चाळेही चालत असल्याची माहिती दामिनी पथकाला मिळाल्यानंतर या पथकाने तब्बल १५ ते २0 दिवस पाळत ठेवली, या ठिकाणच्या गैरकृत्याचा विश्वास पटल्यानंतर सोमवारी सायंकाळी छापा घातला. यामध्ये योगेश ढोरे हा एका युवतीसोबतच सायबर कॅफेमध्ये बसलेला असल्याचे दिसल्यानंतर त्याच्यावर आणि एका युवतीवर डाबकी रोड पोलीस स्टेशनमध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. सदर सायबर कॅफेमध्ये प्रेमी युगुलांचे अश्लील चाळे चालत असल्याच्या तक्रारीही परिसरातील नागरिकांनी केल्याची माहिती आहे.