पटसंख्या वाढविण्यात दानापूरची शाळा तेल्हारा तालुक्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:15 AM2021-07-15T04:15:11+5:302021-07-15T04:15:11+5:30
दानापूर : जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या वाढावी, यासाठी शासनाकडून विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात. जिल्हा परिषद, अकोला शिक्षण ...
दानापूर : जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या वाढावी, यासाठी शासनाकडून विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात. जिल्हा परिषद, अकोला शिक्षण विभागाच्या वतीने सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळेतील पटसंख्या वाढावी, यासाठी प्रथम येणाऱ्या शाळेला बक्षीस ठेवण्यात आले होते. यामध्ये तेल्हारा तालुक्यातून दानापूर येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला असून, शाळेच्या खात्यात प्रथम क्रमांकाचे १५ हजार रुपये बक्षीस म्हणून जमा करण्यात आल्याची माहिती आहे.
जि.प. शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या वाढावी, यासाठी शिक्षण विभागामार्फत तालुका स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक येणाऱ्या शाळांना बक्षिसे देण्यात आली आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत पटसंख्या वाढली, त्या शाळेच्या खात्यात बक्षिसाची रक्कम वळती करण्यात आली आहे. तसे अधिकृत पत्र मिळाले आहे. दानापूर येथील जिल्हा परिषद शाळेला तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद अकोला तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती यांनी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, शिक्षिका, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. येथील मुख्याध्यापक, शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या शाळेबद्दल जनजागृती करून पटसंख्या वाढविण्यासाठी मदत केली, असे मत शाळा शिक्षण समितीचे अध्यक्ष महादेवराव वानखडे यांनी मांडले.
------------------
शैक्षणिक साहित्यावर केला जाणार खर्च
पटसंख्या वाढविण्याच्या स्पर्धेत तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा(मुले) या शाळेने तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. या शाळेच्या खात्यात प्रथम क्रमांकाचे बक्षीस रोख रक्कम १५ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. जमा करण्यात आलेल्या रकमेतून शाळेला लागणारे शैक्षणिक साहित्य, शाळेची गुणवत्ता, शाळेतील पटसंख्या वाढावी यासाठी खर्च केला जाईल, असे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विश्वेश्वर पातुर्डे यांनी सांगितले.
---------------------