पेरणीच्या वेळी दांडी; काढणीच्या वेळी जोर
By admin | Published: March 13, 2015 01:36 AM2015-03-13T01:36:58+5:302015-03-13T01:36:58+5:30
एका वर्षात तीन वेळा शेतकर्यांना ‘अवकाळी’ पावसाचा फटका
विवेक चांदूरकर / अकोला: निसर्ग शेतकर्यांवर कोपला असून, २0१४-१५ या वर्षी खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात पेरणीच्या वेळी आवश्यकता असताना पावसाने दांडी दिली तर काठणीच्यावेळी आवश्यकता नसताना अवकाळी पाऊस धो-धो बरसला. त्यामुळे एकाच वर्षात शेतकर्यांना कोरडा व ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. परिणामी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. संपूर्ण वर्षात दोन्ही हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यामुळे कुटुंबाचे पालन पोषण कसे करावे, असा गंभीर प्रश्न शेतकर्यांपुढे उभा ठाकला आहे.
२0१४ साली खरीप हंगामात पावसाने दांडी दिली. ७ जूनपासून पावसाळ्याला सुरुवात होते. त्यामुळे जून महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात वर्हाडात पेरणी केली जाते. यादरम्यान पेरणी झाली तर पिकेही जोमात येतात. मात्र, गत वर्षी जुलै महिन्याच्या २३ तारखेला म्हणजे तब्बल दीड महिने पाऊस उशिरा आला. त्यामुळे संपूर्ण हंगामच बदलला. मूग व उडिदाची पिके बाद झाली. त्यामुळे केवळ कपाशी व सोयाबीनची पेरणी करण्यात आली. जुलै व ऑगस्ट महिन्यात पाऊस धो धो बरसला. त्यानंतर परतीचा पाऊस आलाच नाही. पेरणी तब्बल दोन महिने उशिरा झाल्यामुळे व परतीचा पाऊस न आल्यामुळे या पिकांच्याही उत्पादनात प्रचंड घट आली. जवळपास ७0 टक्के शेतकर्यांना खरीप हंगामात ५0 टक्क्यांपेक्षाही जास्त घट आली. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले. खरीप हंगामात नुकसानीचा सामना करावा लागल्यानंतर शेतकर्यांना रब्बी हंगामापासून अपेक्षा होती. मात्र, रब्बी हंगामातही शेतकर्यांच्या पदरी निराशाच आली. परतीचा पाऊस न आल्यामुळे रब्बी हंगामात जमीन कोरडी होती. परिणामी १५ ते २0 टक्के शेतकर्यांनी पेरणीच केली नाही. रब्बी हंगामात हरभरा व गव्हाची मोठय़ा प्रमाणात पेरणी केली जाते. मात्र जमिनीत ओल नसल्यामुळे या पिकांच्याही उत्पादनात घट आली. नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यात पेरणी करण्यात आलेली ही पिके फेब्रुवारी व मार्च महिन्यात काढणीला येतात. गहू व हरभर्याची पिके काढणीला आली असतानाच अवकाळी पाऊस बरसला. त्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. २८ फेब्रुवारीला आलेल्या पावसामुळे शेतकर्यांच्या तोंडचा घास हिरावल्या गेला. त्यामुळे यावर्षी आवश्यकता असताना पाऊस आलाच नाही तर अवकाळी पाऊस अनेकदा बरसला.