लोहारी-मुंडगाव रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:24 AM2021-08-20T04:24:13+5:302021-08-20T04:24:13+5:30
मुंडगाव : अकोट तालुक्यामधील लोहारी-मुंडगाव या दोन किलोमीटरच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ राहते. त्यामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे ...
मुंडगाव : अकोट तालुक्यामधील लोहारी-मुंडगाव या दोन किलोमीटरच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ राहते. त्यामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच या रस्त्यावरून नेहमीच पाणी वाहत असल्यामुळे रस्त्याचे डांबरीकरण पूर्णपणे वाहून गेले. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना वारंवार अपघात होत आहेत; परंतु या रस्त्याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मुंडगाव-लोहारी हा रस्ता परिसरातील गावांकरिता सर्वात सरळ मार्ग असल्यामुळे या रस्त्यावरून शेगाव तेल्हारा, अकोला, अकोट जाण्या-येण्यासाठी सोयीचा आहे. त्यामुळे या रस्त्यावरून खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. विशेष म्हणजे, मुंडगाव येथे संत गजानन महाराज पादुका संस्थान, दवाखाना, शाळा, बाजार असल्याने येथे पंचक्रोशीतील नागरिक दर्शनाकरिता, शिक्षण, दवाखान्याच्या कामासाठी व बाजारात येत असतात; परंतु मुंडगाव-लोहारी या रस्त्याच्या कडेला पाणी वाहून जायला मार्ग नसल्यामुळे पावसाचे पूर्ण पाणी या रस्त्यावरून वाहत आहे. लोहारी-मुंडगाव हा दोन किमी डांबरीकरण असलेला रस्ता पूर्णपणे उखडला आहे. त्यामुळे या रस्त्यावर खूप मोठमोठे खड्डे पडले. त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणे खूप कठीण झाले आहे. पावसाळ्यात या रस्त्यावरून नेहमी पाणीच पाणी राहते. रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत.
मुंडगाव-लोहारी हा दोन किलोमीटरचा रस्ता प्रवास करण्यायोग्य नाही. या रस्त्यावरून जात असताना बऱ्याच वेळा अपघात होतात व या रस्त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे व रुग्णांचे हाल होताना पाहिले. त्यामुळे हा रस्ता होणे खूप गरजेचे आहे.
- देवलाल ठाकरे, सेवानिवृत्त पोलीस पाटील, लोहारी
जि.प.मधील सर्व निधी कोरोनामुळे आरोग्य विभागाकडे वळविण्यात आला आहे. सध्या जि.प.कडे निधी उपलब्ध नाही. मुळात दोन गावांना जोडणारे रस्ते हे पालकमंत्री करणार आहेत.
- सुश्मिता सरकटे, जि.प. सदस्या, मुंडगाव सर्कल
मुंडगाव येथे प्रा. आ. केंद्र असल्यामुळे या ठिकाणी गरोदर महिलांना प्रसूतीसाठी या रस्त्यावरून नेत असताना रुग्णाला आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
- सुकेशनी सपकाळ, आशासेविका, लोहारी