दुष्काळाची छाया गडद!
By admin | Published: October 9, 2015 02:01 AM2015-10-09T02:01:41+5:302015-10-09T02:01:41+5:30
शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष आज बुलडाण्यात.
खामगाव : गत तीन वर्षांंपासून सातत्याने ओल्या व कोरड्या अवर्षणाच्या गर्तेत अडकलेल्या बुलडाणा जिल्ह्यात कृषिमाल उत्पादनातील घट, चार हंगामांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांना बसलेला फटका आणि अवर्षणसदृश स्थितीत बुलडाण्यात शेतकरी आत्महत्यांचा वाढता आकडा पाहता, जिल्ह्यात दुष्कळसदृश स्थि तीची छाया गडद झाली आहे. दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर शेतकरी आत्महत्या हा विषय केंद्रस्थानी ठेवून कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी बुलडाण्यात महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. पंधरा वर्षांंमध्ये शेतकरी आत्महत्यांचा आकडा सुमारे १६00 वर पोहोचला असताना जिल्ह्यातील कृषी, सिंचन, मत्स्य, वैरण विकास यांसह अन्य विभागांची एकत्रित बैठक घेऊन शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या जिल्ह्यातील अँक्शन प्लॅनवर साधकबाधक चर्चा होतेय. एकीकडे जलचक्रातील अनियमितता शेतकर्यांना मारक ठरत आहे. गेल्या तीन वर्षांंपासून हवामानाने जिल्ह्यातील शेतकर्यांना धोका दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये बैठक घेत जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जलसंपदा विभाग, शिक्षण विभाग, कृषीसह संबंधित खात्याचे अधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. या बैठकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात ८ ऑक्टोबरला दिवसभर धावपळ होती. जिल्ह्यातील शे तकरी आत्महत्या रोखण्यासाठी बनविण्यात आलेल्या अँक्शन प्लॅनच्या अनुषंगाने येत्या काळात करण्यात येणार्या उपायोजनांचा आराखडा बनविण्यात अधिकारी वर्ग व्यस्त होता. पश्चिम विदर्भात बुलडाण्याची स्थिती बिकट असून, सिंचनाचा पाच हजार कोटींचा अनुशेष पाहता, या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय होतो का, याकडे लक्ष लागून आहे.