विद्युत भवनसमोर अंधार; नागरिकांची महावितरणच्या कार्यालयात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:17 AM2017-07-18T01:17:39+5:302017-07-18T01:17:39+5:30
न्यू भागवत प्लॉट परिसरात रोज ८ ते १० तास विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांनी शनिवारी महावितरणच्या कार्यालयात धाव घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महावितरण कंपनीचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवनसमोरील न्यू भागवत प्लॉट परिसरात रोज ८ ते १० तास विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांनी शनिवारी महावितरणच्या कार्यालयात धाव घेतली. नागरिकांनी मुख्य अभियंत्यांना निवेदन सादर केले, तसेच संबंधित अभियंत्यास समज देऊन ही समस्या िनकाली काढावी, अशी मागणी केली आहे.
सध्या पावसाळ्याच्या दिवसात थोडी जरी हवा सुटल्यास, पाऊस आल्यास अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित होतो. अनेक भागात वायरवर झाडांच्या फांद्या पडत असल्याने वायर तुटण्याच्या घटनाही नित्याच्याच झाल्या आहेत. जुने शहरात तर अनेक ठिकाणी वायर कमी उंचीवर असल्याने जड वाहनांमुळे वायर तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, विद्युत खंडित होण्याचा प्रकार आता तर महावितरणचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवन परिसरातही घडत आहे. न्यू भागवत प्लॉट परिसरातील नागरिक विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने त्रस्त झाले आहेत. नागरिकांनी मुख्य अभियंत्यांकडे धाव घेऊन समस्यांचा पाढाच वाचला. यावेळी राजेश पाटील, विनोद लाहोटी, अर्चना पांडे, अशोक झंवर, तुषार सोमाणी, दिनेश गाढे, दीप्ती जोशी, मंजिरी काळे, उमेश पोपट, शशांक परमार, चिमनभाई दोडिया, पुरुषोत्तम अग्रवाल, सतीश सहस्त्रबुद्धे, नवलचंद कोचेरा, तुषार मालविय, प्रकाश काळे, चंद्रकांत देशमुख, सुरतसिंह ठाकूर, वसंत सोनोने, डॉ. पुरुषोत्तम तायडे, प्रकाश मारडिया हे निवेदन देण्यासाठी गेले होते.
रात्री रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य
न्यू. भागवत प्लॉट परिसरात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत. अनेकदा रात्री अचानक विद्युत पुरवठा खंडित असल्याने पथदिवेही बंद होतात. अशा वेळी एखाद्या रुग्णाला रुग्णालयात घेऊन जाताना त्यांच्या नातेवाइकांची कसरत होते. रात्री विद्युत पुरवठा खंडित राहत असल्याने चोरट्यांचे फावले असून, नागरिकांच्या संपत्तीवर डल्ला मारण्याचे प्रकार घडत आहेत. हलगर्जी करणाऱ्या अभियंत्यांवर वरिष्ठ का कारवाई करीत नाहीत, असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.
टोल फ्री नंबर त्रासदायक
विद्युत पुरवठा खंडित झाल्यास या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधल्यास ग्राहकाला ग्राहक क्रमांक नोंदवण्यास सांगण्यात येते. त्यानंतर १५ ते २० मिनिट प्रतिसाद देत नाही. नंतर कॉल ग्राहक सेवा प्रतिनिधीकडे ट्रान्सफर केला जातो. अनेकदा ग्राहक सेवा प्रतिनिधी तक्रार नोंदवली असे सांगतात, मात्र तक्रार क्रमांकच देत नाहीत. तक्रारकत्यार्ने मागणी केल्यानंतरही त्याला तक्रार क्रमांक न देता ह्यतुमची तक्रार संबंधितांकडे फॉरवर्ड केली आहेह्ण, असे सांगून फोन बंद करतात, असा प्रकार अनेक तक्रारकर्त्यांसोबत घडला आहे.