कोरोनामुळे अंध व्यक्तींसमोर अंधार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:15 AM2021-05-28T04:15:07+5:302021-05-28T04:15:07+5:30
मागील एक वर्षापासून कोरोनामुळे सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्व व्यवहार ठप्प असून घरखर्चही भागविणे कठीण झाले आहे. ...
मागील एक वर्षापासून कोरोनामुळे सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्व व्यवहार ठप्प असून घरखर्चही भागविणे कठीण झाले आहे. यामध्ये सर्वाधिक फटका हा दिव्यांगांना बसला आहे. कोरोनावाढीमुळे दिव्यांग बांधव घरातच बंद झाले आहेत. अनेक दिव्यांगांचे शहरात छोटे-मोठे व्यवसाय करून उदरनिर्वाह सुरू होता. कडक निर्बंधांमुळे तेदेखील बंद झाले आहे. त्यामुळे आर्थिक समस्या भेडसावत आहे. अंध व्यक्तींना स्पर्शाने अनेक गोष्टींची ओळख होत असते. याद्वारे ते आपल्या भावना व्यक्त करू शकतात; मात्र कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग आणि इतर उपायांमुळे दिव्यांगांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे.
स्वत:ला व्यक्त करताना अडचणी
अंध व्यक्तींना स्पर्शाने अनेक गोष्टींची ओळख होत असते. याद्वारे ते आपल्या भावना व्यक्त करू शकतात. तर दुसरीकडे मूकबधिर ओठांच्या हालचालीने संवाद साधत असतात आणि स्वत:ला व्यक्त करतात; परंतु कोरोना काळात यांना अनेक अडचणी येत आहेत.
आधारही एकमेकांचाच!
घरखर्च भागविण्यासाठी आम्ही व्हाइट फिनाईल बनवितो. हे फिनाईल घरी तयार करून प्रत्येक दुकानात जाऊन, दवाखान्यात जाऊन विक्री करतो. कोरोना रुग्ण वाढत आहे व निर्बंध असल्याने बाहेर निघणे बंद आहे. प्रतिसादही कमी प्रमाणात मिळत आहे.
- उमेश मेहरकर
कोरोनाकाळाआधी कागदाचे पॉकेट बनवून विक्री करीत होतो. यावर उदरनिर्वाह सुरू होता; परंतु गेल्या काही महिन्यांपासून हा व्यवसाय बंद आहे. आर्थिक अडचणी वाढल्या असून नवीन काही करणे अशक्य होत आहे.
- सागर भोपळे
झाडांना लागत असलेली कीड, बुरशीवर उपाययोजनांसाठी लागणारी औषधी विक्री करीत असतो. घरपोच सेवा देत होतो. आता लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाला आहे. विक्री मंदावली आहे. आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.
- प्रसन्न तापी
कोरोनाकाळात दिव्यांग बांधवांना अडचणी येत आहेत. अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. या दिव्यांगांना फाउंडेशनने मदतीचा हात दिला आहे. फाउंडेशनतर्फे दिव्यांगांना अन्नधान्य वाटप करण्यात आले आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सामाजिक उपक्रम, कार्यशाळा व तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत मार्गदर्शन सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात येत आहे.
- विशाल कोरडे, अध्यक्ष, दिव्यांग सोशल फाउंडेशन