भर उन्हाच्या दिवसात अकोल्यात पसरला अंधार!
By संतोष येलकर | Published: April 7, 2023 03:06 PM2023-04-07T15:06:02+5:302023-04-07T15:06:14+5:30
वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाड अन् विजांच्या कडकडात अवकाळी पाऊस बरसल्याने भर उन्हाच्या दिवसात अकोला शहरात अंधार पसरला होता.
अकोला : जीवाची लाही-लाही करणाऱ्या कडाक्याच्या उन्हाच्या दिवसात शुक्रवारी दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन आभाळात ढग दाटून आले. वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाड अन् विजांच्या कडकडात अवकाळी पाऊस बरसल्याने भर उन्हाच्या दिवसात अकोला शहरात अंधार पसरला होता.
यंदाच्या उन्हाळ्यात एप्रिलमध्ये अकोला जिल्ह्यात तापत्या उन्हाचा चटका मोठ्या प्रमाणात वाढला असून जीवाची लाही - लाही करणाऱ्या कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. प्रचंड उन्हाचा चटका आणि उकाड्याचा सामना करावा लागत असतानाच शुक्रवारी दुपारी अचानक वातावरणात बदल झाला.
आभाळात ढग दाटून आले. वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाड आणि विजांच्या कडकडाटांत दुपारी १ वाजताच्या सुमारास अकोला शहरात अवकाळी पाऊस बरसला. शहरासह जिल्ह्यातील काही भागातही अवकाळी पाऊस बरसल्याने वृत्त आहे.
ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस बरसल्याने, भर उन्हाच्या दिवसांत शुक्रवारी दुपारी अकोला शहर आणि परिसरात अंधार पसरला होता. यासोबतच अवकाळी पाऊस बरसल्याने वातावरणात गारवा पसरला.त्यामुळे जीवाची लाही लाही करणाऱ्या तापत्या उन्हाच्या उकाड्यापासून काहीकाळ अकोलकर नागरिकांना दिलासा मिळाला.