शालार्थ प्रणालीच्या डाटा बेस सॉफ्टवेअरचा गोंधळ सुरूच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 01:45 PM2019-07-21T13:45:06+5:302019-07-21T13:45:14+5:30
शालार्थ प्रणालीच्या डाटा बेस सॉफ्टवेअर बंद पडल्यामुळे शिक्षकांचे वेतन आॅफलाइन पद्धतीने वितरित करण्याचे परिपत्रक शासनाने गुरुवारी काढले.
अकोला: शालार्थ प्रणालीच्या डाटा बेस सॉफ्टवेअरचा गोंधळ सुरूच आहे. सॉफ्टवेअर कधी आॅनलाइन होते तर कधी आॅफलाइन होते. या प्रकारामुळे शिक्षकांना आता आॅनलाइन वेतन होईल तर कधी आॅफलाइन पद्धतीने वेतन होईल, असे पत्रक शिक्षण विभागातून सातत्याने काढण्यात येते. आता पुन्हा शालार्थ प्रणालीच्या डाटा बेस सॉफ्टवेअर बंद पडल्यामुळे शिक्षकांचे वेतन आॅफलाइन पद्धतीने वितरित करण्याचे परिपत्रक शासनाने गुरुवारी काढले.
शालार्थ प्रणाली ही महाआयटीकडून विकसित करण्यात आली होती. त्यानुसार सर्व जिल्ह्यांमध्ये जुलै २0१९ पासूनचे वेतन शालार्थ प्रणालीमधून अदा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या; परंतु सातारा, ठाणे व जालना जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये शालार्थ प्रणालीमधून वेतन अदा करण्याबाबत तांत्रिक अडचणी असल्यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन आॅफलाइन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यात खासगी अंशत: पूर्णत: अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतरांचा समावेश आहे. ज्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालार्थ क्रमांक मिळालेला आणि आणि जे शालार्थ क्रमांक मिळविण्यासाठी पात्र आहेत, अशा शिक्षकांचे आॅगस्ट २0१९ पर्यंतचे नियमित व थकीत वेतन आॅफलाइन पद्धतीने करण्यास मान्यता दिली आहे. शालार्थ प्रणालीमधील तांत्रिक दोष दूर केल्यानंतर शिक्षकांचे वेतन आॅनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे, असे परिपत्रकात म्हटले आहे.