शिक्षक भरतीसाठी ‘तारीख पे तारीख’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 01:50 PM2019-07-29T13:50:39+5:302019-07-29T13:50:44+5:30

गेल्या दोन वर्षांपासून शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू आहे. अंतिम टप्प्यात आलेल्या शिक्षक भरतीसाठी शासनाला मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र आहे.

'Date on Date' for Teacher Recruitment! | शिक्षक भरतीसाठी ‘तारीख पे तारीख’!

शिक्षक भरतीसाठी ‘तारीख पे तारीख’!

Next

- संदीप वानखडे
अकोला: पसंतीक्रम नोंदविल्यानंतर गुणवत्ता यादी व नियुक्तीची प्रतीक्षा करणाºया अभियोग्यताधारकांना पुन्हा एकदा तारीख मिळाली आहे. मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीसाठी जवळपास ८५ हजार अभियोग्यताधारकांनी पसंतीक्रम नोंदविले आहेत. जून महिन्यात उमेदवारांची नियुक्ती करण्याची घोषणा शासनाने केली होती; मात्र पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे जुलैअखेरही गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात शासनाला अपयश आले आहे. पवित्र पोर्टलवर उमेदवारांसाठी सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. २ आॅगस्ट रोजी उमेदवारांच्या निवडीविषयी पुन्हा सूचना प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू आहे. अंतिम टप्प्यात आलेल्या शिक्षक भरतीसाठी शासनाला मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र आहे. पसंतीक्रम भरण्यामध्ये जवळपास दीड महिन्याचा वेळ गेल्यानंतर आता अभियोग्यताधारकांना निवड यादी लागण्याची प्रतीक्षा आहे. जून २०१९ पर्यंत शिक्षक भरती पूर्ण करण्याचे शासनाचे नियोजन पूर्णपणे फसले असून, जुलैअखेरही केवळ तारीख मिळत असल्याने अभियोग्यताधारकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. शिक्षकांची भरती पारदर्शी करण्याच्या उद्देशाने शासनाने पवित्र पोर्टलमार्फत भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही शिक्षक भरती या ना त्या कारणाने रखडलेली आहे. आचारसंहितेमुळे थांबलेले पवित्र पोर्टलचे काम मे महिन्यात सुरू करण्यात आले होते. प्राध्यान्यक्रम कसे भरावे, याविषयी मार्गदर्शन करणारा व्हिडिओ अपलोड करण्यात आल्यानंतर २२ मेपासून प्रत्यक्षात प्राध्यान्यक्रम भरण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर तांत्रिक अडचणींमुळे पुन्हा १ जूनपासून प्राधान्यक्रम उमेदवारांसाठी उपलब्ध करून देण्यात आले. त्यानंतर वारंवार सूचना देऊनही ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम भरले नाही, त्यांच्यासाठीही शासनाने तीन दिवस उपलब्ध करून दिले. त्यामुळे शिक्षक भरतीला शासन जाणीवपूर्वक विलंब करीत असल्याचा आरोप अभियोग्यताधारकांनी केला आहे. शासनाने सामाजिक आरक्षणाविषयी शासनादेश जारी केल्याने शिक्षक भरती पुन्हा एकदा रखडण्याची चिन्हे आहेत. शिक्षक भरती आणखी लांबण्याची चिन्हे दिसताच अभियोग्यताधारकांनी शिक्षणमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. अभियोग्यताधारकांचा रोष कमी करण्यासाठी शासनाने पवित्र पोर्टलवर पुन्हा एकदा सूचना जारी केल्या आहेत.

 

Web Title: 'Date on Date' for Teacher Recruitment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.