घरुनच मतदानासाठी तारखा निश्चित; मतदान पथके पोहोचणार २३५८ मतदारांच्या घरी!
By संतोष येलकर | Published: April 13, 2024 02:29 PM2024-04-13T14:29:40+5:302024-04-13T14:30:21+5:30
लोकसभा निवडणूक; दिव्यांग, वयोवृद्ध मतदार घरी राहून बजावणार मतदानाचा हक्क.
संतोष येलकर, अकोला : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघातील ७२६ दिव्यांग आणि ८५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या १ हजार ६३२ अशा एकूण २ हजार ३५८ मतदारांना घरुनच मतदान (होम व्होटिंग) करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यासाठी निवडणूक आयोगामार्फत मतदानाच्या तारखा निश्चित करण्यात आल्या असून, मतदानाकरिता नियुक्त करण्यात आलेली स्वतंत्र मतदान पथके संबंधित मतदारांच्या घरी पोहोचणार आहेत. या पार्श्वभूमीवर निश्चित केलेल्या तारखांना दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांनी घरी राहून मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांनी शुक्रवारी केले.
लोकसभा निवडणुकीत घरुन मतदान करण्यासाठी अकोला लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग व ८५ पेक्षा अधिक वयाच्या मतदारांकडून प्राप्त विकल्पानुसार मतदारांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार २ हजार ३५८ मतदारांना घरुन मतदान करण्यासाठी स्वतंत्र मतदान पथके नियुक्त करण्यात आली असून, ही मतदान पथके नेमून दिलेल्या तारखांना मतदान नोंदविण्याकरिता संबंधित मतदारांच्या घरी पोहोचणार आहेत.
घरुन मतदानासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय अशा आहेत तारखा !
अकोला लोकसभा मतदारसंघात अकोट विधानसभा मतदारसंघ आणि अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मतदारांना १८ व १९ एप्रिल रोजी किंवा आवश्यकता वाटल्यास २२ एप्रिल रोजी, बाळापूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना १५ व १६ एप्रिल रोजी किंवा आवश्यकता वाटल्यास १९ एप्रिल रोजी, अकोला पूर्व मतदारसंघातील मतदारांना १५ व १६ एप्रिल किंवा आवश्यकता वाटल्यास २० व २१ एप्रिल रोजी, मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना १८ व १९ एप्रिल किंवा आवश्यकता वाटल्यास २० व २१ एप्रिल रोजी आणि रिसोड विधानसभा मतदारसंघातील मतदारांना १३ व १५ एप्रिल किंवा आवश्यकता वाटल्यास १८ एप्रिल रोजी घरुन मतदान करता येणार आहे. संबंधित तारखेला मतदान पथके मतदारांच्या घरी पोहोचणार आहेत.