प्रकट दिनानिमित्त ‘माझी वारी, स्वच्छ वारी’ जाणीव जागृती अभियान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 01:39 AM2018-02-06T01:39:00+5:302018-02-06T01:39:07+5:30
भाविकांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती व्हावी, या दृष्टिकोनातून संवेदना क्रिएटिव्ह क्लबतर्फे ७ फेब्रुवारी रोजी ‘माझी वारी, स्वच्छ वारी’ जाणीव जागृती अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. गजानन नारे, व्यंगचित्रकार गजानन घोंगडे, डॉ. नंदकुमार चेडे यांनी सोमवारी सायंकाळी पत्रपरिषदेत दिली.
अकोला : संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त शेगाव पायदळ वारीला जाणार्या मार्गावर भाविकांसाठी मोठय़ा स्वरूपात श्रद्धेने अन्नदान केले जाते. दरम्यान, भाविकांकडून प्रसाद उष्टा टाकल्या जातो. पत्रावळ्या, द्रोण, प्लास्टिकचे ग्लास फेकल्या जातात. वारी मार्गावर सर्वत्र अस्वच्छता दिसून येते. भाविकांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती व्हावी, या दृष्टिकोनातून संवेदना क्रिएटिव्ह क्लबतर्फे ७ फेब्रुवारी रोजी ‘माझी वारी, स्वच्छ वारी’ जाणीव जागृती अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. गजानन नारे, व्यंगचित्रकार गजानन घोंगडे, डॉ. नंदकुमार चेडे यांनी सोमवारी सायंकाळी पत्रपरिषदेत दिली.
गत पाच वर्षांपासून शेगाव वारी मार्गावर व्यापक प्रमाणात ‘माझी वारी, स्वच्छ वारी’ हे जाणीव जागृती अभियान संवेदना क्रिएटिव्ह क्लबच्यावतीने राबविण्यात येत आहे. श्रींच्या प्रकट दिनानिमित्त शेकडो भाविक पायदळ वारीने शेगावी दर्शनासाठी जातात. पायदळ वारी मार्गावर ठिकठिकाणी सामाजिक व धार्मिक संस्था अन्नदान करतात; परंतु अन्नदान करताना, ठिकठिकाणी उष्ट्या पत्रावळी, प्लास्टिकचे ग्लास फेकल्या जातात. अन्नाची नासाडी होते. अन्न हे पूर्णब्रम्ह आहे.ते नुसतं उदरभरण नाहीतर एक यज्ञकर्म आहे. याची जाणीव भाविकांना व्हावी, यासाठी संवेदना क्रिएटिव्ह क्लबच्यावतीने ५00 स्वयंसेवकामार्फत भाविकांना अन्नदात्यांच्या प्रसादाचा मान राखा, उष्टे अन्न टाकू नका, अशा संदेश देणार्या गांधी टोप्यांचे वितरण करण्यात येईल. असे सांगत, डॉ. गजानन नारे, गजानन घोंगडे यांनी, या उपक्रमामध्ये ४७ सामाजिक संघटना सहभागी झाल्या आहेत. निंबा फाटा येथे तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर ६ फेब्रुवारी रोजी आयोजित केले आहे. तसेच गत पाच वर्षात ज्या-ज्या ठिकाणी अन्नाची नासाडी झाली. तेथील छायाचित्र, चित्रफिती, प्लास्टिकच्या प्लेट्स, ग्लासेस उघड्यावर फेकल्यामुळे झालेली अस्वच्छता अशी छायाचित्रे एकत्र करून एक चित्रफित तयार करण्यात आली. ही चित्रफित शेगावकडे जाणार्या प्रमुख तीन मार्गावर एलईडी प्रोजेक्टरद्वारे भाविकांना दाखवून जनजागृती करण्यात येईल. पत्रपरिषदेला डॉ. आर. बी. निचळ, अमोल शिरसाट, पी. एस. वाघाडे, अभिषेक उदावंत, नीलेश वैतकार, डॉ. संकेत राऊत, राहुल उमक, डॉ. आय. एस. हुसेन, दिनेश बगाडे, आर. व्ही. कराड, प्रणय सातव, समीर शिरवळकर, निशिकांत बडगे, अजय गावंडे, शुभम भांडे, डॉ. गणेश घोगरे, आरीफ सय्यद, इकबाल हुसेन, डॉ. विनोद हरणे आदी उपस्थित होते.
मान्यवरांचा चित्रफितीद्वारे स्वच्छतेचा संदेश
वारकरी, भाविकांमध्ये स्वच्छतेची जाणीव जागृती व्हावी, या उद्देशाने संवेदना क्रिएटिव्ह क्लबतर्फे अकोला जिल्हय़ातील विविध क्षेत्रात कार्यरत प्रख्यात मान्यवरांच्या संदेशाची चित्रफीत तयार करण्यात आली. यात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, सुभाष पवार, प्रसिद्ध वर्हाडी कवी डॉ. विठ्ठल वाघ, माजी आ. प्रा. तुकाराम बिरकड, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, डॉ. अभय पाटील, डॉ. हर्षवर्धन मालोकार, ज्येष्ठ उद्योजक नाना उजवणे, आंतरराष्ट्रीय व्याख्याते सचिन बुरघाटे, सप्त खंजिरीवादक सत्यपाल महाराज, कवी किशोर बळी आदींचे संदेश आहेत.
दहा हजार लोकांनी भरले स्वच्छता संकल्प पत्र
वारी मार्गावर स्वच्छता राखली जावी, या उद्देशाने संवेदना क्रिएटिव्ह क्लबतर्फे हजारो शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छतेची प्रतिज्ञा देण्यात आली आणि विद्यार्थ्यांमार्फत पालक व त्यांच्या नातेवाईकांकडून संकल्प पत्र भरून घेण्यात आले. दहा हजार लोकांनी हे संकल्प पत्र भरून दिले.