अकोलासह राज्यातील १४ ड महापालिकांना डीसी रूल लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2016 01:44 AM2016-09-22T01:44:08+5:302016-09-22T01:44:08+5:30
अकोल्यातील ईमारती बांधकामांना मिळेल चालना; पाईंट एकने वाढ झाल्याने बिल्डर्सवर्गात आनंद.
अकोला, दि. २१: अकोलासह राज्यातील चौदा ड महापालिकांसाठी विकास नियंत्रण नियमावली (डीसी रूल) लागू झाल्याने गत काही वर्षांपासून रखडलेल्या ईमारती बांधकांना चालना मिळणार आहे. नवीन डीसी रूलमध्ये चटई क्षेत्र (एफएसआय) पाईंट एकने वाढले असल्याने दहा टक्क्यांची वाढ झाली. तर प्रीमीअम भरल्यानंतर चटईक्षेत्र ३0 आणि त्यापेक्षाही जास्त टक्क्यांनी वाढणार असल्याने बिल्डर वर्गालाही बराच दिलासा मिळाला आहे. बिल्डरांसह डीसी रूलजा फायदा राज्याच्या महापालिकांच्या महसूल विभागाला देखील होणार आहे.
जमिनीचे चटईक्षेत्र संपुष्टात येण्याचा धोका लक्षात घेत महाराष्ट्र राज्यातील १४ ड वर्ग महापालिकांसाठी नवीन विकास नियमावली तयार करण्याचे काम काही दिवसांपासून सुरू होते. यासाठी राज्यभरातून सूचना आणि हरकती मागविल्या गेल्या होत्या. पुणे येथील नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागाने डीसी रूलचा अहवाल नगर विकास विभागाकडे सादर केला होता. चटईक्षेत्रात (एफएसआय) वाढ करण्याची मागणी शिवसेनेसह राज्यातील क्रेडाई संघटनेच्या पदाधिकार्यांनी केली होती. तेंव्हापासून अकोल्यासह राज्यातील १४ ड वर्गाच्या महापालिका डीसी रूलची प्रतीक्षा होती.
डीसी रूल नुकताच लागू झाला आहे. २0९ पानांच्या या नियमावलींचा अभ्यास करायला जवळपास चार दिवस तरी लागतील. त्यानंतर ईमारती बांधकामांना मंजुरी दिली जाईल. मात्र ज्या बिल्डर्संनी आधीच चार पट अतिरिक्त बांधकाम केले आहे, त्यांचे बांधकाम मात्र पाडण्यात येईल. त्यामुळे महापालिका आणि बिल्डर दोघांसाठी डीसी रूल परिणामकारक ठरले.
-अजय लहाने, महापालिका आयुक्त, अकोला.
नियमावलीचे पॅरामीटर लावण्याची आमची अनेक वर्षांची मागणी होती. त्यामुळे राज्यभरात डीसी रूलचे स्वागतच होईल. जुन्या अनधिकृत ठरविलेल्या ईमारती नियमित करता येतील तर नवीन नियमानुसार होतील. महापालिकेने डीसी रूल संदर्भातील बारकावे समजावून सांगण्यासाठी बिल्डर्सची कार्यशाळा घेतली पाहीजे.
-पंकज कोठारी, माजी उपाध्यक्ष, क्रेडाई, महाराष्ट्र.