हातगाव परिसरात मृत चिमण्या आढळल्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:20 AM2021-01-20T04:20:00+5:302021-01-20T04:20:00+5:30
मूर्तिजापूर : तालुक्यातील हातगाव येथे एका घरात चार चिमण्या मृतावस्थेत आढळल्याने मृत चिमण्या आढळून आलेल्या घरापासून १० किलोमीटर ...
मूर्तिजापूर : तालुक्यातील हातगाव येथे एका घरात चार चिमण्या मृतावस्थेत आढळल्याने मृत चिमण्या आढळून आलेल्या घरापासून १० किलोमीटर त्रिज्येतील परिसर सतर्क क्षेत्र म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी घोषित केले आहे. ‘बर्ड फ्लू’च्या धास्तीने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हातगावअंतर्गत येत असलेल्या बायपास परीसरातील राम हिंगणकर यांच्या घराच्या परीसरात मृत चिमण्या आढळल्या आहेत. राम हिंगणकर दररोज चिमण्यांना दाणे टाकतात. शनिवारी सकाळी हिंगणकर यांना घराच्या आंगणात दोन व लगत दुसऱ्या बाजूस दोन अशा चार चिमण्या मृतावस्थेत आढळल्या. याबाबत राम हिंगणकर यांनी प्रशासनाला माहिती कळविताच जिल्हा पशूधन आयुक्तांनी या मृत पक्षांचे नमुने पुण्याच्या रोग अन्वेषण विभागामार्फत भोपाळच्या उच्च सुरक्षा पशूरोग संस्थेकडे पाठविले आहेत. या नमुन्यांचा अहवाल प्राप्त होईपर्यंत राम हिंगणकर यांच्या निवासस्थानाच्या आजूबाजूचा दहा किलोमीटर परिसर सतर्क क्षेत्र म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार घोषित करण्यात आला आहे.
प्रभावित क्षेत्रातील परिसरात सोडियम हायड्रॉक्साइड किंवा पोटॅशियम परमँगनेटने निर्जंतुकीकरण करावे, या क्षेत्रातील पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्यांना मास्क व हातमोजे वापरणे अनिवार्य करावे, बाहेरचे पशु-पक्षी येणार नाहीत, याबबत दक्षता घ्यावी, पक्षांसंबंधी आवश्यक नोंदी ठेवाव्यात, असे नमूद असणाऱ्या या आदेशाचा भंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे पोलीस ठाण्यांना निर्देशित करण्यात आले आहे. असेच निर्बंध अकोल्यातील सीईओंच्या निवासस्थान परिसरात दोन कावळे मृतावस्थेत आढळल्यामुळे त्यांच्या निवासस्थानाच्या दहा किलोमीटर त्रिज्येतील परिसरासाठी लागू करण्यात आले आहेत. परिसरात मृतपक्षी आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.