नवोदय विद्यालय प्रवेशासाठी शनिवारपर्यंत अंतिम मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 01:56 PM2018-12-11T13:56:25+5:302018-12-11T13:56:54+5:30
काही तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्ज भरता आले नाहीत. त्यामुळे ही मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
अकोला: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)च्यावतीने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेशासाठी परीक्षा घेण्यात येते. यंदा इयत्ता सहावी आणि नववीतील विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी आॅनलाइन अर्ज करण्यासाठी ३0 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती; परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्ज भरता आले नाहीत. त्यामुळे ही मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
सहावी व नववीतील विद्यार्थ्यांसाठी जवाहर नवोदय विद्यालयाची आॅनलाइन प्रवेश परीक्षा २ फेब्रुवारी २0१९ आणि ६ एप्रिल २0१९ रोजी होणार आहे. २८ राज्यांमधील ६३0 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि आरक्षणाच्या आधारावर जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड केली जाणार आहे. ही परीक्षा नि:शुल्क घेण्यात येते. केंद्र शासनांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध होत असल्याने, जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसावे. अकोला जिल्ह्यातील बाभुळगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयामध्ये इयत्ता सहावीच्या ८0 जागा आणि नववीच्या रिक्त जागांवर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी डब्लूडब्लूडब्लू. नवोदय. गर्व्हमेंट. इन या संकेतस्थळावर आॅनलाइन अर्ज करावेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली. (प्रतिनिधी)