आंतरजिल्हा बदली प्रणालीवर रिक्त पदांची माहिती नोंदविण्यास मुदतवाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 11:47 AM2020-02-02T11:47:29+5:302020-02-02T11:47:37+5:30
संगणकीय आंतरजिल्हा बदली प्रणालीवर रिक्त पदांची माहिती नोंदविण्यास ७ फेब्रुवारीपर्यंत शासनाने मुदतवाढ देण्यात आली आहे.
अकोला: जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकाच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून बिंदूनामावली तपासणीचे काम सुरू आहे; परंतु काही जिल्हा परिषदांमध्ये बिंदूनामावली तपासणी करण्यात येत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संगणकीय आंतरजिल्हा बदली प्रणालीवर रिक्त पदांची माहिती नोंदविण्यास ७ फेब्रुवारीपर्यंत शासनाने मुदतवाढ देण्यात आली आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयाकडून शिक्षकांच्या बिंदूनामावली अद्ययावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या बदली प्रणालीमधील लॉगिनला रिक्त जागांची नोंद सुविधा २0 ते ३१ जानेवारीपर्यंत उपलब्ध करून देण्यात आली होती. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या बिंदूनामावली विभागीय आयुक्त कार्यालयाकडून तपासून अद्ययावत करून प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागांची माहिती संबंधित प्रणालीमध्ये तातडीने भरण्यात यावी. रिक्त पदांची माहिती भरताना, टप्पा क्रमांक १, २ व ३ मध्ये आंतरजिल्हा बदलीने कार्यमुक्त करण्याचे आणि रूजू करून घेण्याची शिक्षकांची माहिती भरण्यात यावी. शासनाने ३१ जानेवारीपर्यंत माहिती भरण्यास मुदत दिली होती; परंतु अनेक जिल्हा परिषदांची अद्यापपर्यंत बिंदूनामावली तपासणी झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शासनाने आंतरजिल्हा बदली प्रणालीवर रिक्त पदांची माहिती नोंदविण्यास ७ फेब्रुवारीपर्यंत शासनाने मुदतवाढ दिली.