शाळासिद्धी अंतर्गत शाळांच्या स्वयंमूल्यांकनासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 04:29 PM2019-12-11T16:29:02+5:302019-12-11T16:29:50+5:30
शाळांना स्वयंमूल्यांकनासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असून, १00 टक्के स्वयंमूल्यांकन करण्याचे निर्देश शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी दिले आहेत.
अकोला: प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मूल्यांकन व प्रमाणिकरण करून घेणे व शाळांची गुणवत्ता वाढविणे महत्त्वाचे असून, त्यासाठी शैक्षणिक, भौतिक व संस्थात्मक गुणवत्तावाढीच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने शाळासिद्धी कार्यक्रम सुरू केला आहे. शाळांना स्वयंमूल्यांकनासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असून, १00 टक्के स्वयंमूल्यांकन करण्याचे निर्देश शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी दिले आहेत.
राज्यातील शाळांचे १00 टक्के स्वयंमूल्यांकन निपा, नवी दिल्ली यांच्या शाळासिद्धी पोर्टलवर करणे आवश्यक असून, या पोर्टलवर शाळांना २0१९-२0 ची माहिती भरावी लागणार आहे. शाळासिद्धी कार्यक्रमांतर्गत शाळांचे १00 टक्के मूल्यांकन झाले पाहिजे. यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित केली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाºयांची आढावा बैठक घेऊन शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांच्यामार्फत शाळासिद्धी कार्यक्रमांतर्गत शाळांचे १00 टक्के मूल्यांकन झाले पाहिजे. या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देशही शिक्षण संचालकांनी दिले आहेत. गतवर्षीप्रमाणे शाळांनी स्वयंमूल्यांकन करताना, पर्याप्तता व उपयोगिता, गुणवत्ता आणि उपयुक्तता या मुद्यांना उपलब्ध नाही, असे म्हणण्याची चूक करू नये. २0१८-१९ चे स्वयंमूल्यांकन पूर्ण केलेल्या शाळांपैकी ज्या शाळांना ए ग्रेड मिळाले आहेत. त्या शाळांना बाह्यमूल्यांकन करण्याबाबत वेगळ्या सूचना देण्यात येणार आहेत. शाळांची संख्या लक्षात घेता, जिल्हा स्तरावर शाळासिद्धी संपर्क अधिकारी, तालुकास्तरीय संपर्क निर्धारक नियुक्त करण्याचे निर्देशही शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी दिले आहेत.