आणखी एकाचा मृत्यू; ३० नवे पॉझिटिव्ह, ९३ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 05:34 PM2020-10-30T17:34:28+5:302020-10-30T17:34:35+5:30
Akola CoronaVirus Update तेल्हारा येथील रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा २७९ वर पोहचला आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला असला, तरी मृत्यूचे सत्र सुरुच आहे. शुक्रवार, ३० आॅक्टोबर रोजी तेल्हारा येथील रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा २७९ वर पोहचला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,३८४झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे १६५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १३५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये अकोला शहरातील सातव चौक येथील चार, मूर्तिजापूर, रजपुतपुरा व राजंदा येथील प्रत्येकी तीन, गणेश नगर, रामदास पेठ, रेणुका नगर व तोष्णीवाल लेआऊट येथील प्रत्येकी दोन, तारफैल, जीएमसी, देवरावबाबा चाळ, जठारपेठ, महाजन प्लॉट, जवाहर नगर, भागवत वाडी जुने शहर, अकोट व बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
७८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू
शुक्रवारी माधव नगर, ता. तेल्हारा येथील ७८ वर्षीय पुरुषचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना २५ आॅक्टोबर रोजी दाखल करण्यात आले होते.
९३ जणांना डिस्चार्ज
शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सहा, हॉटेल रिजेन्सी येथून दोन, अकोला अॅक्सीडेंड क्लिनिक येथून तीन, ओझोन हॉस्पिटल येथून एक, कोविड केअर सेंटर येथून एक तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले ८० अशा एकूण ९३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
२४१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,३८४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ७,८६४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २७९जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत २४१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.