कोरोना बाधिताचा मृत्यू : पुरेपूर खबरदारीत केले जातात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 12:09 PM2020-09-07T12:09:53+5:302020-09-07T12:10:07+5:30
वैद्यकीय सूचनांची पूर्ण खबरदारी व प्रत्येकाच्या धर्मानुसार विधी करूनच अंत्यसंस्कार केले जात आहेत.
अकोला : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिक धास्तावले असून, कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढतेच आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतकांच्या नातेवाइकांसाठी अंतिम संस्काराच्या विधीमध्येही कोविड नियमांचे पालन आवश्यक आहे. त्यामुळे आप्त स्वकियांच्या अंतिम संस्कार प्रसंगातही फक्त कुटुंबातील निवडक लोकांनाच प्रवेश मिळतो. वैद्यकीय सूचनांची पूर्ण खबरदारी व प्रत्येकाच्या धर्मानुसार विधी करूनच अंत्यसंस्कार केले जात आहेत.
अकोल्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या मृत्यूदराची चिंता प्रशासनासमोर गंभीरपणे उभी ठाकली आहे. रविवारपर्यंत तब्बल १६५ मृत्यूची नोंद झाली असून, सप्टेंबर महिन्यात दररोज सरासरी दोन मृत्यू आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूचा प्रसंग हा नातेवाइकांसाठी अतिशय क्लेषदायक व कठीण होतो. संसर्गाच्या कारणामुळे मृतकाचे कलेवर अंतिम दर्शनासाठी घरी नेता येत नाही, तसेच गर्दी टाळण्यासाठी आप्त स्वकियांनाही बोलविता येत नाही. त्यामुळे अंतिम संस्कारावरही कोरोना नियमांचे बंधन आले आहे.
अशी होते प्रक्रिया
- कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यावर मृतकाच्या नातेवाइकाला कळविले जाते
- मृतदेहाला वैद्यकीय दक्षतेनुसार रॅपिग केले जाते
- मृतदेह सर्वोपचारच्या शवागृहात ठेवला जातो
- मृतकाच्या धर्मानुसार अंतिम संस्कार केले जावे यासाठी नातेवाइकांच्या सूचनेनुसार अंतिम संस्काराचे ठिकाण ठरविले जाते.
- स्मशानभूमी किंवा कब्रस्थान निश्चितीनंतर रुग्णवाहिकेची व्यवस्था केली जाते
- अंतिम संस्कारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून चार पीपीई किट दिले जातात
- दोन पीपीई किट रुग्णवाहिका चालक व मदतनीससाठी व दोन किट मृतकाचा अंतिम विधी करणाऱ्या नातेवाइकांसाठी असतात
- नातेवाइकाच्या हस्ते विधीपूर्वक अंतिम संस्कार केले जातात
कोरोनाबाधित रुग्णांच्या अंतिम संस्कारासाठी अकोला कच्छी मेमन जमातच्या वतीने चमू कार्यरत आहे. आता दोन पथक, दोन रुग्णवाहिका मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. मृतकाच्या धार्मिक पद्धतीनुसार त्यांच्या नातेवाइकांच्या हस्तेच अंतिम संस्कार केले जातात.
- जावेद जकरिया
अध्यक्ष, कच्छी मेमन जमात