कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू; जि.प. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळणार विमा कवच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 04:30 PM2020-11-22T16:30:50+5:302020-11-22T16:32:27+5:30
कुटुंबीयांना संबंधित जिल्हा परिषद प्रशासनाकडून विमा कवच रक्कम लवकरच वितरित करण्यात येणार आहे.
अकोला: कोरोना काळात कर्तव्य बजावताना कोरोना विषाणू संसर्गामुळे ३० सप्टेंबरपर्यंत मृत्यू झालेल्या राज्यातील ११ जिल्हा परिषदांच्या १७ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची विमा कवच रक्कम देण्याचा निर्णय शासनाच्या ग्रामविकास विभागाने २० नोव्हेंबर रोजी घेतला. त्यानुसार कर्तव्य बजावताना कोरोना संसर्गामुळे मयत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना संबंधित जिल्हा परिषद प्रशासनाकडून विमा कवच रक्कम लवकरच वितरित करण्यात येणार आहे.
कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रित करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांमध्ये कर्तव्य बजावताना कोरोना विषाणूचा संसर्गामुळे गत ३० सप्टेंबरपर्यंत राज्यातील ११ जिल्हा परिषदांच्या १७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना (वारसास) प्रत्येकी ५० लाख रुपयांची विमा कवच रक्कम मिळण्यासंदर्भात संबंधित जिल्हा परिषद प्रशासनाकडून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यानुषंगाने कर्तव्य बजावताना कोरोना संसर्ग आजारामुळे मृत्यू झालेल्या ११ जिल्हा परिषदांच्या १७ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे विमा कवच रक्कम वितरित करण्याचा निर्णय शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत २० नाेव्हेंबर रोजी घेण्यात आला. विमा कवच रक्कम देण्यासाठी राज्य शासनामार्फत राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान राज्य प्रकल्प संचालकांना प्राधिकृत करण्यात आले आहे. त्यांच्यामार्फत विमा कवच रक्कम संबंधित जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे उपलब्ध होणार आहे. जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून मृत्यू झालेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची विमा कवच रक्कम वितरित करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदनिहाय कर्मचारी मृत्यूची अशी आहे संख्या!
कोरोना काळात ३० सप्टेंबरपर्यंत कर्तव्य बजावताना कोरोना विषाणू संसर्गामुळे राज्यातील ११ जिल्हा परिषद अंतर्गत १७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यामध्ये भंडारा १, अहमदनगर २, पुणे ४, ठाणे १, रायगड १, सांगली १, जळगाव १, कोल्हापूर १, नागपूर २, अमरावती २ व सातारा जिल्हा परिषद अंतर्गत १ कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.