भूसंपादन मोबदल्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतक-याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 10:46 AM2020-11-13T10:46:48+5:302020-11-13T10:52:58+5:30
शासनाकडून न्याय मिळावा, अशी अपेक्षा या कुटुंबाने व्यक्ती केली आहे.
- विजय शिंदे
अकोट (जि. अकोला) : अकोट तालुक्यातील शहापूर धरणात जमीन गेल्याने भूमिहीन झालेल्या शेतक-याने भूसंपादनाचा संपूर्ण मोबदला मिळावा याकरिता संघर्ष केला. या संघर्षात ढासळलेली आर्थिक परिस्थिती व जमिनीचा माेबदला मिळत नसल्याच्या तणावात शिवपूर येथील रामदास राऊत या प्रकल्पग्रस्त शेतक-याचा अखेर हृदयविकाराच्या झटक्याने ११ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. या घटनेची हृदयद्रावक स्थिती मृत शेतकरऱ्यांच्या मुलांनी ‘लोकमत’ कार्यालयात कथन केली. त्यांच्या मृत्यूनंतर तरी शासनाकडून न्याय मिळावा, अशी अपेक्षा या कुटुंबाने व्यक्ती केली आहे.
अकोला जिह्यातील अकोट तालुक्यात शिवपूर कासोद येथे शहापूर लघुपाटबंधारे विभागाच्या धरण प्रकल्पाकरिता रामदास राऊत, त्यांची पत्नी बेबीताई व वडील बबन राऊत यांचे नावे असलेली शेत सर्व्हे गट क्रमांक २३५,२३८ व २२७ मधील १० एकर ३० गुंठे जमीन संपादित करण्यात आली. या भूसंपादनाचा निवाडा भूसंपादन अधिनियम, १८९४ चे कलम १२ नुसार करण्यात आला. या निवाड्याचा आदेश २० ऑगस्ट २००८ रोजी पारित करण्यात आल्यानंतर राऊत कुटुंबाची १० एकर ३० गुंठे सर्व शेती ताब्यात घेत मोबदला म्हणून अवघे ५ लाख ३० हजार रुपये देण्यात आले होते. विशेष म्हणजे या मोबदल्याच्या रकमेमधून जिल्हा मध्यवर्ती बँकेने ६० हजार रुपये पीक कर्जाची कपात करून शेतक-याच्या हाती ४ लाख ७० हजार ठेवले. मोबदल्याची रक्कमसुध्दा दोन टप्प्यात देण्यात आली. अल्प मोबदला मिळत असल्याने तसेच दिलेल्या मोबदल्याच्या रकमेत एक एकर शेतीसुध्दा विकत मिळत नसल्याने या भूमिहीन शेतक-याने संबंधित भूसंपादन अधिकारी, शहापूर लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी यांची भेट घेतली असता, त्यांना कायदा दुरुस्ती करणे सुुरू आहे त्यामुळे अधिक मोबदला मिळणार, भूमिहीन होत असल्याने ई-क्लासची जमीन तसेच शासकीय सेवेत कुंटुबांतील एकाला नोकरी देण्याचे आश्वासन त्यावेळी देऊन बोळवण केली होती.
परंतु १२ वर्षांचे कालावधीत केवळ प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात आले. भूसंपादन संबंधित नोटीस बोर्डवर जाहीरनामा लावल्याचे दाखवित शेतकी सूचना पत्रावर सह्या घेऊन २०-८० टक्के असा दोन टप्प्यात मोबदला घेतल्यानंतरही आक्षेप नोंदविता येत असल्याची हमी देत नोकरी व भूमिहीन झालेल्यांना ई-क्लास जमिनी देण्याचे आश्वासन दिले होते. आश्वासनाची पूर्तता होत नसल्यामुळे रामदास राऊत यांनी अल्प मोबदल्याबाबत आक्षेप नोंदवित शासनाविरुध्द याचिकासुध्दा दाखल केली आहे; परंतु अद्यापही न्याय मिळाला नाही. अशा स्थितीत मानसिक तणावामुळे रामदास राऊत यांचे हृदयविकाराने निधन झाले.
पीएमओकडून दखल...
जमिनीचा मिळालेला अल्प मोबदला, शासकीय नोकरी नाही. त्यामुळे रामदास राऊत यांनी थेट प्रधानमंत्री कार्यालयात नरेंद्र मोदी यांना आपली व्यथा कळविली होती. प्रधानमंत्री कार्यालयाने राऊत यांच्या पत्राची दखल घेत तत्काळ कार्यवाही करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव यांना २१ डिसेंबर २०१७ रोजी कळविले होते; परंतु न्याय मिळाला नाही.
आमचे वडील शेतमालकाचे भूमिहीन शेतमजूर झाले. दहा एकराच्या भूसंपादनापोटी मिळालेल्या अल्प मोबदल्यात अर्धीही शेती घेता आली नाही. त्यामुळे त्यांनी न्यायाकरिता संघर्षमय लढा सुरू ठेवला होता. ते सतत तणावात होते. मानसिक ताणतणावाने त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम झाला. अशातच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शेतीच्या हक्काच्या मोबदल्याकरिता आपल्या वडिलांचा लढा आपण सुरूच ठेवणार आहे
- शिवकुमार रामदास राऊत, शिवपूर