मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मजुराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 11:17 AM2021-04-22T11:17:28+5:302021-04-22T11:18:50+5:30
Death of a laborer by being crushed under a mound of soil : पिल्लरची बांधणी करीत असताना बाजूलाच काम करणाऱ्या पोकलँड मशीनमुळे सदर मातीचा ढिगारा घसरला.
पातूर : सुरक्षा संदर्भात सर्व नियम धाब्यावर बसविणाऱ्या कंपनीच्या निष्काळजीमुळे बिहारच्या ३६ वर्षीय मजुराचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. ही घटना बुधवारी सकाळी घडली. याप्रकरणी पातूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोेंद केली.
पातूर-बाळापूररोडवरील डॉ. वंदनाताई ढोणे आयुर्वेद महाविद्यालयाच्या जवळून पातूर शहराबाहेरून वळण घेऊन जाणाऱ्या अकोला-मेडशी महामार्गाच्या बायपास उड्डाणपुलाच्या पिल्लर निर्मितीच्या कामावर बिहारच्या राकेश रामराज गोंड (रा. बिशुनपुरा, शिवान, जगदीशपूर) या मजुराचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी सहकारी मजुरांनी दिली. पिल्लरची बांधणी करीत असताना बाजूलाच काम करणाऱ्या पोकलँड मशीनमुळे सदर मातीचा ढिगारा घसरला. त्यामध्ये दबून मजुराचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मोंटो कार्लो कंपनीच्या निष्काळजीमुळे मजुराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मातीखाली दबलेला मजुराचा मृतदेह चक्क पोकलॅन्डने काढण्यात आला. त्यामुळे मृतदेहाच्या डोक्यावर, चेहऱ्यावर व मानेवर खोल जखमा झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे सदर कंपनीवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
घटनेची माहिती मिळताच, तहसीलदार दीपक बाजड, पोलीस निरीक्षक हरीश गवळी, मुख्याधिकारी सोनाली यादव यांनी घटनास्थळावर धाव घेतली.
कंपनीविरुद्ध अनेक तक्रारी, तरीही अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष का?
वृत्तसंकलन करण्याकरिता गेलेल्या पत्रकारांना घटनास्थळी माहिती घेण्यासाठी अटकाव करण्यात आला. त्यामुळे सदर कंपनीच्या कार्यपद्धतीबद्दल सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे.
अकोला- मेडशी महामार्गाचे काम सुरू झाले. तेव्हापासून मोंटो कार्लो कंपनी शासकीय नियमांची पायमल्ली करून कामकाज करीत आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी. तहसीलस्तरावर अनेक तक्रारी करण्यात आल्या. मात्र याकडे डोळेझाक का येते.