'त्या' रुग्णांचाच शासकीय रुग्णालयात मृत्यू; देवेंद्र फडणवीसांनी दिलं स्पष्टीकरण
By सचिन राऊत | Published: October 7, 2023 01:37 PM2023-10-07T13:37:47+5:302023-10-07T13:38:19+5:30
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अकोल्यातील महाआरोग्य शिबिरात माहिती
अकोला : मोठमोठी खासगी रुग्णालय बहुतांश वेळा अखेरच्या घटका मोजत असलेल्या रुग्णांसह गंभीर जखमी रुग्णांना उपचार नकारतात त्यामुळे असे रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांचा काही क्षणात किंवा वेळेत मृत्यू होतो, असाच प्रकार नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घडल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाआरोग्य शिबिरात दिली.
नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोन ते तीन दिवसात ५५ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे; मात्र हे मृत्यू केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात औषधोपचार नाही म्हणून झाले नसून खासगी रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण ज्यांचा लवकरच मृत्यू होणार आहे अशा रुग्णांना ऐन वेळेवर सुट्टी दिल्यामुळे त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. सुटीच्या काळात खासगी रुग्णालयात स्टाफ नसल्याने ते बंद असतात किंवा कमी क्षमतेने सुरू असतात त्यामुळे असे रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविल्याने त्यांचा मृत्यू झालयाचे प्रकार घडतात.
नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घडलेला प्रकार असाच असल्याचे दिसून येत असून यामध्ये नांदेड येथील डॉक्टर किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची कोणतीही हलगर्जी नसल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. केवळ मृत्यूशयेवर असलेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयाने उपचार नाकारल्याने ते शासकीय महाविद्यालयात दाखल झाले आणि त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. केवळ राजकीय भावनेतून बदनामी करण्यात येत असलयाचेही फडणवीस यांनी सांगितले.