लोहाऱ्यात उष्माघाताने वृद्धाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 06:38 PM2019-04-29T18:38:43+5:302019-04-29T18:38:46+5:30
अकोला शहरासह जिल्ह्यात सूर्य आग ओकत असल्याने उष्माघातामुळे तिसरा बळी गेला आहे.
लोहारा(अकोला) : गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली आहे. अकोला शहरासह जिल्ह्यात सूर्य आग ओकत असल्याने उष्माघातामुळे तिसरा बळी गेला आहे. लोहारा येथे एका अनोळखी वृद्धाचा मृतदेह २८ एप्रिल रोजी रात्री आढळून आला. या वृद्धाचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अकोला शहरासह जिल्ह्याचे तापमान ४७ अंशांच्या वर पोहोचले आहे. या तापमानाचा फटका लहान मुलांसह वृद्धांना सर्वाधिक बसत आहे. लोहारा येथे गावात फिरणाºया एका अनोळखी वृद्धाचा मृतदेह ईदगाह मदरशाजवळ रविवारी रात्री आढळला. या वृद्धाचे वय अंदाजे ५५ ते ६० च्या दरम्यान आहे. त्याचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा प्राथमिक अंदाज उरळ पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सतीश पाटील यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला, तसेच प्रेत उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठवले.