मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वर्षभरात तीन वाघ, तीन बिबट्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 06:03 PM2019-05-26T18:03:32+5:302019-05-26T18:03:37+5:30
अकोट: मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित भागात तसेच प्रकल्पाच्या बाहेर वाघ, बिबट मृतावस्थेत आढळून येण्याच्या घटना वाढत आहेत. वर्षभरात तीन वाघ व तीन बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.
- विजय शिंदे
अकोट: मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित भागात तसेच प्रकल्पाच्या बाहेर वाघ, बिबट मृतावस्थेत आढळून येण्याच्या घटना वाढत आहेत. वर्षभरात तीन वाघ व तीन बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. बहुतांश मृत्यूचे कारण नैसर्गिक असल्याचे सांगण्यात येत आहे; परंतु या मृत्यूच्या घटना वन्यजीवप्रेमींमध्ये चिंताजनक ठरत आहेत. एकट्या अकोट उपविभागात सहा महिन्यांत सर्वाधिक घटना समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे, अकोट वन्यजीव विभागात वाघ सर्वाधिक संख्या वाढल्याचे बुद्ध पौर्णिमेला करण्यात आलेल्या जनगणनेत स्पष्ट झाले आहे. पाण्यात बुडून होणारे मृत्यू हा चौकशीचा विषय ऐरणीवर येत आहे.
२०१९ या कालावधीत घडलेल्या घटनामध्ये बहुतांश घटना अकोट विभागाशी संबंधित आहेत. अकोला, बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवर वारखेड नदीपात्रात गत मार्च महिन्यात शिकाऱ्यांनी लावलेल्या फासात अडकून एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर वान धरणाच्या कालव्यामधील पाण्यात एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना तेल्हारा तालुक्यातील सौंदळा शेतशिवारात घडली होती. पश्चिम मेळघाट वन विभागातील हाय पॉइंट या ठिकाणी गत जानेवारी महिन्यात एक दीड वर्षाचा बिबट मृतावस्थेत आढळून आला होता. हा मृत्यू बिबट्याचा पाय घसरून पाण्यात पडल्याने झाले असल्याचे सांगण्यात आले. अकोट तालुक्यातील राहणापूर या शिवारात एक वाघ कुजलेल्या मृतावस्थेत आढळून आला होता. जितापूर भागात एका वाघाच्या मृत्यूमागे रानडुकरासोबत झालेली झुंज हे कारण सांगण्यात आले होते. गत आठवड्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अतिसंरक्षित वनात कोहा गावाजवळील तलावात टी-३२ या वाघाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये धारगड जंगलात एका वाघाचा मृत्यू झाला होता. या वाघाच्या मृत्यूचे कारण नैसर्गिक सांगण्यात आले होते.
राज्यात दोनच पशुवैद्यकीय अधिकारी
महाराष्ट्रात वनखात्याचे दोनच पशुवैद्यकीय अधिकारी हे वाघाचे शवविच्छेदन व अहवाल देणारे आहेत. त्यामुळे खासगी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून काम भागविले जात आहेत. या पशुवैद्यकीय अधिकारी यांनी अनेकदा पाण्यात पडल्याने नैसर्गिक मृत्यूची प्राथमिक कारणे दिली आहेत. न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे अहवाल अद्यापही अधिकृतपणे जाहीर झाले नसल्याने अनेक मृत्यूंचे ठोस कारण कळू शकले नाही. हे अहवाल येण्यास दीड ते दोन वर्षे लागत असल्याने वन विभागाचे अधिकारी यांना नेमके ठोस उपाययोजना शोधण्यापासून वंचित राहावे लागत असल्याचे समजते. मेळघाट हा वन्य प्राण्यांचे सुरक्षित अधिवास क्षेत्र समजल्या जाते. मेळघाट क्षेत्रसंचालक श्रीनिवास रेड्डी हे सतत वन्य प्राण्यांची सुरक्षितता व संवर्धनासाठी सक्षमपणे काम करीत असल्याने झपाट्याने मेळघाटात वन्य प्राणी वाढत आहेत.
पाण्याच्या शोधात वन्य प्राण्यांची गावाकडे धाव
सध्या सातपड्याच्या पायथ्याशी असलेल्या गाववस्ती, शेतशिवारात वन्य प्राण्यांचा संचार वाढला आहे. पिंप्री जैनपूर, अकोली जहा.सह परिसरातील केळीच्या बागा वाघाचे अधिवास क्षेत्र होत आहे. दुसरीकडे वाघ, बिबटसह वन्य प्राण्यांच्या मृत्यूचे बहुतांश कारण हे पाण्यात बुडून दिसल्याने नैसर्गिक मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे हे मृत्यू रोखण्यासाठी वन अधिकाऱ्यांसह वन्यजीवप्रेमींचा लोकसहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.