दाखल होताच २४ तासात १८ जणांना मृत्यूने गाठले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:12 AM2021-03-29T04:12:26+5:302021-03-29T04:12:26+5:30
अकोला : जिल्ह्यात गत महिनाभरापासून कोरोनाने धुमाकूळ घातला असून, अनेक जण बेफिकिरीचे बळी ठरत आहेत. अनेक जण लक्षणे असूनही ...
अकोला : जिल्ह्यात गत महिनाभरापासून कोरोनाने धुमाकूळ घातला असून, अनेक जण बेफिकिरीचे बळी ठरत आहेत. अनेक जण लक्षणे असूनही कोविडची चाचणी टाळत आहेत, तर बहुतांश लोक घरीच उपचार घेण्यास प्राधान्य देत आहेत, मात्र हा प्रकार रुग्णांच्या जीवावर बेतणारा ठरत आहे. गत महिनाभरात रुग्णालयात दाखल झाल्यानंतर २४ तासांतच १८ जणांना मृत्यूने गाठले आहे. ही आकडेवारी धक्कादायक असून नागरिकांनी कोविडच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेण्याचे आवाहन आराेग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. जिल्ह्यात फेब्रुवारीपासून कोविडच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली. मार्च महिन्यात त्याची तीव्रता आणखी वाढल्याचे दिसून आली. मागील २८ दिवसांत ८० रुग्णांना मृत्यूने गाठले. हा आकडा थक्क करणारा असला, तरी अनेकांकडून अजूनही बेफिकिरी बाळगण्यात येत आहे. कोरोनाच्या भीतीने अनेक जण कोविड चाचणी न करता घरीच उपचार करण्यास पसंती दर्शवित आहेत. फॅमिली डॉक्टरकडे उपचार केल्यानंतर दोन ते तीन दिवस रुग्णाला बरे वाटते, मात्र त्यानंतर अचानक रुग्णाच्या प्रकृतीमध्ये बिघाड होऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येत आहे. याच प्रकारामुळे गत महिनाभरात १८ रुग्णांना रुग्णालयात दाखल केल्याच्या २४ तासांत मृत्यूला सामोरे जावे लागले. म्हणजेच मार्च महिन्यात झालेल्या एकूण ८० रुग्णांच्या मृत्यूच्या २२ टक्के रुग्णांचा मृत्यू हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर २४ तासांत झाला आहे. ही स्थिती गंभीर आहे.
मृतांमध्ये ६० वर्षावरील रुग्णांचे प्रमाण जास्त
रूग्णालयात दाखल केल्यानंतर २४ तासांत मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये ६० वर्षांवरील रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. १८ पैकी १५ रुग्ण हे ६० वर्षावरील वयोगटातील आहेत. ही बाब लक्षात घेता नागरिकांनी वयोवृद्धांच्या तब्बेतीची काळजी घेण्याची गरज आहे.
खासगी रुग्णालयाची चूक रुग्णांच्या जीवावर
जिल्ह्यातील काही खासगी रुग्णालयात कोविडच्या संदिग्ध रुग्णांवर केवळ सीटी स्कॅन अहवालाच्या आधारावर उपचार सुरू आहेत. चार ते पाच दिवसांच्या उपचारानंतर रुग्णांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्यास त्यांना कोविड चाचणी करण्याचा सल्ला दिला जात आहे. अहवाल येईपर्यंत रुग्णाच्या प्रकृतीमध्ये आणखी बिघाड होऊ लागतो. त्याला कोविड उपचारासाठी सर्वोपचार किंवा इतर खासगी कोविड रुग्णालयात संदर्भित केल्या जाते. रुग्ण या रुग्णालयांत दाखल झाल्यानंतर त्याचे शरीर उपचाराला प्रतिसाद देत नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यात एकूण मृत्यू - ४४६
मार्च महिन्यात झालेले मृत्यू - ८०
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर २४ तासांत मृत्यू झालेले रुग्ण - १८