हिवतापसदृश आजाराने युवतीचा मृत्यू
By admin | Published: October 15, 2016 03:22 AM2016-10-15T03:22:02+5:302016-10-15T03:22:02+5:30
अकोला जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अकोला, दि. १४- हिवताप नियंत्रणासाठी सर्व उपाययोजना करण्याचा दावा मनपाच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात येत असला, तरी हिवतापसदृश आजाराचे अनेक रुग्ण आहेत. सवरेपचारामध्ये उपचार घेत असलेल्या एका तरुणीचा हिवतापसदृश आजाराने मृत्यू झाल्याची घटना बुधवार, १२ ऑक्टोबर रोजी घडली.
शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे हिवताप, डेंग्यू यासारख्या आजारांनी डोके वर काढले आहे. स्थानिक भीमनगर येथील एका १८ वर्षीय तरुणीला हिवतापसदृश आजाराची लागण झाल्यानंतर तिला ११ ऑक्टोबर रोजी सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना बुधवार, १२ ऑक्टोबर रोजी तिचा मृत्यू झाला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सदर युवतीचा बुधवारी मृत्यू झाल्याचे सांगितले. सदर युवतीच्या रक्ताचे नमुने जिल्हा हिवताप विभागाकडे पाठविण्यात आल्याचे सवरेपचारकडून सांगण्यात आले; परंतु रक्ताचे नमुने मिळाले नसल्याचे जिल्हा हिवताप कार्यालयाकडून सांगण्यात आले.
केस पेपरवरील नोंदीमुळे संभ्रम
सदर युवतीवर उपचार करणार्या डॉक्टरांनी तीच्या केसपेपरमध्ये प्रथम तिला हिवताप झाला नसल्याचे नमुद केले, नंतर मात्र तिला हिवताप असल्याचे नमुद करण्यात आले आहे. तसेच मृत्यूच्या कारणामध्ये ह्यश्वासोच्छवास बंद पडून मृत्यूह्ण असा उल्लेख आहे. त्यामुळे मृत्यूच्या नेमके कारण, काय याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.