महिलेचा मृत्यू; नातेवाइकांनी केला घातपाताचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 12:34 PM2019-08-19T12:34:21+5:302019-08-19T12:34:27+5:30
नातेवाइकांनी घातपाताचा संशय व्यक्त करून चौकशी करावी, या मागणीसाठी महिलेचा मृतदेह रविवारी दुपारी खदान पोलीस ठाण्यात आणला.
अकोला : यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी एका महिला राखीपौर्णिमेसाठी अकोल्यात खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत नणंदेकडे आल्यानंतर शनिवारी रात्री विजेच्या धक्क्याने या महिलेचा मृत्यू झाला; मात्र महिलेच्या नातेवाइकांनी घातपाताचा संशय व्यक्त करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, या मागणीसाठी महिलेचा मृतदेह नातेवाइकांनी रविवारी दुपारी खदान पोलीस ठाण्यात आणला. पोलिसांनी दोषींवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह हलविला.
यवतमाळ जिल्ह्यातील गवळपेंड येथील रहिवासी लता रामभाऊ जाधव या शनिवारी संध्याकाळी अकोला येथील त्यांची नणंद मनकर्णा राजू राठोड यांच्याकडे आल्या होत्या. रात्री त्यांना घरात विजेचा शॉक लागला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांचे शवविच्छेदनही करण्यात आले. लता जाधव यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या आई-वडिलांना दिल्यानंतर ते अकोल्यात पोहोचले. तोपर्यंत त्यांचे शवविच्छेदनही करण्यात आले होते. आपल्या मुलीचा मृत्यू शॉक लागून झाला नाही, तर घातपात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त करीत खदान पोलीस ठाणे गाठले व संशयितांना अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांच्या बोलण्यावरून त्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी मृतदेहच खदान पोलीस ठाण्यात आणला होता. त्यानंतर शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्याची हमी पोलिसांनी दिल्यानंतर त्यांनी मृतदेह हलविला. याप्रकरणी खदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खदान पोलिसांनी सुरू केला असून, उत्तरीय तपासणीचा अहवाल समोर आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे.