जीनिंग फॅक्टरीत कन्व्हेअर बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 05:04 PM2018-12-26T17:04:00+5:302018-12-26T17:04:13+5:30
बार्शीटाकळी (जि. अकोला): येथील एका जिनिंग फॅक्टरीत सरकी लोटत असताना कन्व्हेअर बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू झाला.
बार्शीटाकळी (जि. अकोला): येथील एका जिनिंग फॅक्टरीत सरकी लोटत असताना कन्व्हेअर बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना जे.एस.कॉटन या जिनिंग फॅक्टरीमध्ये २६ डिसेंबरच्या पहाटे घडली. रोशन दादाराव खंडारे (२१)असे मृतक मजुराचे नाव आहे.
बार्शीटाकळी येथील जे.एस.कॉटन जीनिंग फॅक्टरीमध्ये रोशन खंडारे हा युवक २५ डिसेंबर रोजी कन्व्हेअर बेल्टवर सरकी लोटण्याचे काम करीत होता. मध्यरात्री १.१० मिनीटांनी सरकी लोटत असताना तो कन्व्हेअर बेल्टमध्ये अडकला. ही घटना इतर कामगार व यंत्र चालकांच्या लक्षात येताच त्यांनी मशिन बंद केली. गंभीर अवस्थेत रोशनला अकोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तो अत्यवस्थ असल्याने त्याला सर्वोपचार रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. रात्रपाळीत काम करीत असलेल्या अक्षय रामायणे, गौरव भटकर, अरुण मांडवगळे, शिवदास वानखडे, गजानन सावळे यांनी जखमी रोशनला तातडीने हलवले. जिनिंगमध्ये मजुरांच्या सुरक्षेसाठी कुठलीही उपाय योजना करण्यात आली नसल्याचे हा अपघात घडल्याचे समोर येत आहे. ही जिनिंग फॅक्टरी सुबोध गोयनका यांच्या मालकीची आहे. या प्रकरणी बार्शीटाकळी पोलिसात वृत्त लिहीस्तोवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.मृतक रोशनच्या मागे आई, वडील, एक भाउ, एक बहीण व आप्त परिवार आहे. (शहर प्रतिनिधी)